

केज / गौतम बचुटे :
केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरात देवदर्शनाला गेलेल्या अंगणवाडी मदतनीस महिलेच्या घरात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. घराचा कोंडा तोडून कपाट फोडण्यात आले असून सुमारे १ लाख ४ हजार रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. या चोरीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदुरघाट येथील अंगणवाडी मदतनीस संध्या संतोष क्षीरसागर या दि. १६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या दोन मुलांसह शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांच्या सोबत गावातील एक मैत्रीण देखील होती. घरात कोणी नसल्याची कल्पना मिळताच चोरट्यांनी संधी साधत रात्री घराच्या दरवाजाचा कोंडा तोडला.
दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी संध्या क्षीरसागर घरी परतल्या तेव्हा घराचा कोंडा तुटलेला दिसताच त्यांना अनर्थाची जाणीव झाली. घरात प्रवेश करताच कपाटाचे कुलूप तोडलेले व कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
तपासून पाहिल्यावर ११ ग्रॅमचा नेकलेस, ९ ग्रॅमचे गंठण, ६ ग्रॅमचे झुबे, ३ ग्रॅमचे पेंडंट, ८.५ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, अर्धा ग्रॅम वजनाची नथ, तसेच दीड भारताचे चांदीचे ब्रेसलेट असे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. एकूण ३२.८५ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने मिळून १ लाख ४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
घरातील सर्व कपाटे उचकापाचक अवस्थेत होती. चोरट्यांना नेमके घरात कुठे दागिने ठेवल्याची माहिती असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात काही संशयित हालचाली झाल्या का? हा प्रकार कोणत्या वेळात झाला? याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी संध्या क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात केज ठाण्यात गु.र. नं. ६४१/२०२५ नुसार भा.दं.वि. ३३१(४), ३०५(अ) या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणे, संशयितांच्या हालचाली तपासणे यासह विविध तपास सुरू केला आहे.
घटना घडलेल्या भागात एक-दोन दिवसांपासून अनोळखी लोक पाहिल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. देवदर्शनासाठी घर सोडून जाणाऱ्या कुटुंबांची माहिती चोरट्यांनी मिळवली असल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये व्यक्त केला जात आहे. घरफोडीच्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.