Cabbage Farming | साळेगावच्या तरुण शेतकऱ्याचा चमत्कार! दोन महिन्यात कोबीमधून पाच लाखांचे उत्पन्न
गौतम बचुटे / केज
केज तालुक्यातील शेती क्षेत्रात एका तरुण शेतकऱ्याने मोठा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या दोन महिन्यांत दोन एकर कोबीच्या पिकातून तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत दत्ता इंगळे या तरुणाने संपूर्ण परिसराचे लक्ष आपल्या दिशेने वेधून घेतले आहे. शेतीत मेहनत, योग्य नियोजन आणि बाजारपेठेची अचूक माहिती असेल, तर अल्प कालावधीतही अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो, याचा हा आदर्श नमुना आहे.
दत्ता इंगळे हे केज तालुक्यातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले तरुण. सामाजिक उपक्रमांसोबत त्यांनी शेतातही काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा संकल्प केला. पारंपरिक पीक घेत राहण्यापेक्षा बाजारात जास्त मागणी असलेल्या आणि कमी कालावधीत पिकणाऱ्या फुलकोबीचे पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार साळेगाव येथील त्यांच्या दोन एकर शेतात उत्तम प्रतीची फुलकोबीची रोपे नर्सरीतून आणून लागवड करण्यात आली.
लागवडीनंतर सुरुवातीपासूनच योग्य पाणी व्यवस्थापन, खतांचा समतोल वापर, नियमित फवारणी आणि वेळोवेळी अंतर मशागत करून पिकाकडे काटेकोर लक्ष देण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे अवघ्या 60 दिवसांत कोबीची फळे तयार झाली. या फुलकोबीचे वजन प्रत्येक फळाला अंदाजे एक ते दीड किलो इतके होते. एकरी पाच टनांपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता, तर दोन एकरात दहा टनांपेक्षा जास्त उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे.
दत्ता इंगळे यांनी तयार झालेला माल थेट हैदराबादच्या बाजारात पाठवण्याचा निर्णय घेतला. सध्या हैदराबादमध्ये कोबीला प्रति क्विंटल 5,000 रुपये दर मिळत आहे. या दरानुसार कोबीची विक्री अतिशय फायद्याची ठरत आहे. आतापर्यंत त्यांनी रोपे, खत, औषधे, मजुरी आणि मशागत यासाठी मिळून सुमारे 1 लाख रुपये खर्च केला. त्यामुळे एकूण मिळणारा नफा 4 लाखांहून अधिक होईल, असा अंदाज आहे.
या प्रयोगामुळे केज तालुक्यातील अनेक तरुण शेतकऱ्यांना नवीन दिशा मिळत आहे. पारंपरिक शेती न करता बाजारात कोणत्या पिकाला जास्त मागणी आहे, कोणते पीक कमी कालावधीत जास्त उत्पन्न देते, याचा विचार करून अनेकजण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. दत्ता इंगळे यांच्या या यशस्वी फुलकोबी शेतीचा तरुण शेतकरी आदर्श घेत आहेत.
दत्ता इंगळे यांनी यापूर्वी दोन वर्षांपूर्वी हळदीची लागवड केली होती. हळदीचे उत्पादन चांगले आले, परंतु बाजारभाव पडल्याने समाधानकारक नफा मिळू शकला नव्हता. त्या अनुभवातून शिकत त्यांनी यावर्षी कोबीचा प्रयोग केला आणि हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला. त्यांच्या या धाडसी पावलामुळे शेती क्षेत्रात नवे चित्र उभे राहिले असून, कमी कालावधीत कमी खर्चात मोठा नफा मिळू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
केज परिसरातील तरुण शेतकरी दत्ता इंगळे यांच्या या यशोगाथेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून, आजूबाजूचे शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. योग्य बाजारपेठेचे नियोजन आणि वेगळा विचार असेल, तर शेतीही उद्योगाप्रमाणे भरभराट करू शकते, यावर हा प्रयोग शिक्कामोर्तब करतो.

