

Shinde group's Ahilyanagar district chief arrested in Beed
आष्टी, पुढारी वृत्तसेवा: सन २०१६ मधील प्राणघातक हल्ला (कलम ३०७) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गेल्या १० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा बाबू सुब्रमण्यम कांबळत उर्फ बाबुशेठ टायरवाले याला आष्टी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपी हा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा अहील्यानगर जिल्हाप्रमुख असल्याने या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दौलावडगाव (ता. आष्टी) येथील अनिल प्रभाकर मस्के यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २०१६ मध्ये अंभोरा पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यातील ११ आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती, मात्र मुख्य आरोपी बाबुशेठ टायरवाले हा गेल्या दशकभरापासून फरार होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते, तरीही तो उजळ माथ्याने फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
अटकेनंतर आरोपीला आष्टी न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या काळात निर्माण झालेला तणाव आणि त्याच वेळी या सत्ताधारी पदाधिकाऱ्याची झालेली अटक, यामुळे हे केवळ दबावतंत्र तर नाही ना, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकीय वरदहस्त की पोलिसांची लापरवाही ?
दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी एका सत्ताधारी पक्षाचा जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असतानाही पोलिसांना सापडत नव्हता. यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव होता की ही त्यांची लापरवाही होती, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तो पोलिसांना सापडत नव्हता की त्याला शोधले जात नव्हते? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.