

'Seva Pandharvada' is only a public welfare initiative : Pankaja Munde
परळी, पुढारी वृत्तसेवा आरोग्याची काळजी घेणे हेच खऱ्या अथनि समाजकार्य आहे. 'सेवा पंधरवडा' ही केवळ एक राजकीय मोहीम नसून लोककल्याणाचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आरोग्य तपासणी शिबीर उद्घाटनप्रसंगी परळीत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हया कालावधीत 'सेवा पंधरवाडा' उपक्रम राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून परळी शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबीर, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमात विविध सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांची तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला दिला. नेत्र तपासणीमध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक तरुण-तरुणींनी या सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हेच खऱ्या अथनि समाजकार्य आहे.
'सेवा पंधरवाडा' ही केवळ एक राजकीय मोहीम नसून लोककल्याणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीप्रमाणेच हा उपक्रम प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हे त्यांच्या कार्यप्रेरणेचे प्रतिबिंब आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळत असल्याचा आनंद आहे. अशा उपक्रमांमुळे समाजाशी असलेली आपुलकी दृढ होते आणि जनसेवेचे बळ वाढते. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी केले.
कार्यक्रमाला जुगलकिशोर लोहिया, विकासराव डुबे, विनोद सामत, रमेश कराड, मंडळ अध्यक्ष उमाताई समशेट्टे, राजेश गिते, वसंत निर्मळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ अरूण गुट्टे यांचेसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार ज्ञानोबा सरवसे यांनी केले तर भाजपचे शहर सरचिटणीस आश्विन मोगरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.