School locked : ढगेवाडीत पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप

पालकांचा संताप; शिक्षक उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड; संबंधितांवर कारवाईची मागणी
School locked
School locked : ढगेवाडीत पहिल्याच दिवशी शाळेला कुलूपfile photo
Published on
Updated on

School locked on first day in Dhagewadi

अतुल शिनगारे

धारूर : एकीकडे जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत होत असताना धारूर तालुक्यातील ढगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मात्र नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षक वेळेत शाळेत न पोहोचल्याने शाळेला कुलूप असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे उत्साहाने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत शाळेसमोर थांबून होते. मात्र शाळा बंदच असल्याने अनेक विद्यार्थी पालकांसह घरी परतले.

School locked
Municipal Schools : मनपा शाळांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्षाचा उत्साह

त्यानंतर एक शिक्षक सकाळी दहा वाजता तर दुसरे शिक्षक साडेदहा वाजता शाळेत पोहोचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिक्षकांना उशिराबाबत विचारणा केली असता, पाठ्यपुस्तके आणण्यासाठी उशीर झाल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र पुस्तके अद्याप शाळेत पोहोचली नसल्याची माहितीही देण्यात आल्याचा दावा पालकांनी केला. जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत, पुस्तक वाटप आणि विविध उपक्रमांमुळे शाळांचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. मात्र ढगेवाडी येथे विद्यार्थी शाळेसमोर उभे राहून शिक्षकांची वाट पाहत असल्याचे चित्र दिसले. परिणामी अनेक शाळा सुरू होण्यापूर्वीच घरी परतावे लागले.

स्वागत सोहळाच नाही

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत, पालकांशी संवाद, शाळा परिसराची स्वच्छता आणि प्रवेशोत्सवाचे नियोजन अपेक्षित असताना ढगेवाडी शाळेत असे कोणतेही नियोजन दिसून आले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पहिल्या दिवशी शिक्षकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी उपस्थित राहून पालकांच्या भेटीगाठी घेणे, विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्न करणे आणि शाळा स्वच्छ ठेवणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात दहा-साडेदहानंतर शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांकडून शाळेची स्वच्छता करून घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. त्यामुळे उत्साहाने आलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस नियोजनाअभावी वाया गेल्याची खंत पालकांनी व्यक्त केली.

School locked
Parbhani School Protest | शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांचे आंदोलन; कोल्हा येथील शाळेला ठोकले कुलूप

पालकांची संबंधितांवर कारवाईची मागणी

या प्रकारामुळे शरद गवळी, शंकर गवळी, ज्ञानेश्वर गवळी, कमलाकर ढगे, अंकुश ढगे यांच्यासह अनेक पालकांनी संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, या प्रकाराची माहिती मिळाल्यास संबंधित शिक्षकांकडून खुलासा मागवून नोटीस बजावली जाईल, असे सांगितले.

ढगेवाडी येथील शाळेबाबतची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थितीची पडताळणी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी, बीड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news