

Santosh Deshmukh Murder Case on Beed Makoka Court Hearing Kej Incident
केज : सरपंच संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणी आज (दि.३) बीड येथील मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीस या घटनेतील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची चल अचल संपत्ती ही जप्त करावी, अशी मागणी करून सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करावे, असे म्हणणे मांडले.
हे म्हणणे मांडत असताना सरकारी वकिलाने हे आरोप कोणकोणत्या पुराव्यानिशी निश्चित करत आहोत, या बाबतची जंत्री न्यायाधीश यांना दिली. यावर बचाव पक्षाच्या वतीने हरकत घेण्यात येऊन आता आरोप निश्चित करता येत नाहीत, असे सांगून या प्रकरणात अद्यापही बचाव पक्षास डिजिटल एविडन्स मिळालेला नाही, आम्ही वारंवार मागणी करत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर मुख्य आरोपीच्या वतीने लावण्यात आलेल्या मकोका कलामास हरकत घेऊन त्या संदर्भात आधी त्यावर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
त्यावर निकम यांनी हस्तक्षेप करत यावरच हा खटला अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. यावर न्यायाधीश यांनी १७ जूनरोजी पुन्हा दोन्ही बाजूने आपले म्हणणे मांडावे, त्यावर पुढील सुनावणी होईल, असे सांगितले.
दरम्यान, वाल्मीक कराडच्या वतीने अॅड. मोहन यादव यांनी १७ जूनरोजी चल अचल संपत्ती बाबत दोन्ही बाजूने युक्तिवाद होऊन त्यावर न्यायालय ठरवेल. शिवाय इतर काही किरकोळ अर्ज सरकारी पक्षाच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे. त्यावर देखील त्याच दिवशी सुनावणी होईल, असे सांगून मकोका बाबत आम्ही हरकत घेतली असून त्यावर त्यादिवशी सुनावणी होईल का? हे आताच सांगता येणार नाही, असे म्हटले.
एकूणच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोन्ही बाजूने तयारी सुरू असून सरकार पक्षाच्या वतीने कुठलीही बाजू कमकुवत राहणार नाही, यादृष्टीने खटल्याची आखणी सुरू केली आहे. तर बचाव पक्षाच्या वतीने लावण्यात आलेले कलम आणि इतर बाबी या दबावापोटी लावण्यात आल्या असून ते खोडून काढण्याच्या दृष्टीने त्यांची रणनीती सुरू आहे. त्यामुळे येत्या १७ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.