

केज: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्चरोजी होणार आहे. या प्रकरणातील वाल्मीक कराड यांच्यासह इतर आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आज (दि. १२) केज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश भाजीपाले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. (Santosh Deshmukh Murder Case)
या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड, खंडणी, ॲट्रॉसिटी आणि मकोका प्रकरणी माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक बाबुराव कराड आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू महादेव चाटे यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले आणि प्रतीक भीमराव घुले, सुधीर ज्ञानोबा चाटे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे आणि फरार असलेला कृष्णा शामराव आंधळे यांच्याविरोधात सीआयडी आणि एसआयटी यांनी २८ फेब्रुवारीरोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
केज येथील जिल्हा व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात आज (दि.१२) यावर सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, सरकारी पक्ष आणि तपास यंत्रणा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील दाखल केलेले पुरावे व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व साहित्य आणि आरोपींचे घेतलेले जबाब याची अधिकृत प्रत मिळालेली नाही. म्हणून पुढील तारीख देण्यात यावी. तसेच यावेळी सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली सर्व माहिती व पुरावे आरोपींच्या वकिलांना रीतसर दिली जाईल. असे सांगितले.
सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून या प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक सरकारी वकील म्हणून ॲड. बाळासाहेब कोल्हे हे काम पाहत आहेत.
दि. १२ मार्चरोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. तसेच आरोपींचे वकील म्हणून ॲड. अनंत तिडके, ॲड. राहुल मुंडे आणि ॲड. विकास खाडे हे आरोपींच्या वतीने काम पाहत आहेत.
संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी शिवराज देशमुख आणि शिवाजी थोपटे यांनी वाल्मीक कराड आणि त्यांचे सहकारी यांच्या विरूद्ध खंडणी व धमकी अशा वेगवेगळ्या तक्रारी दाखल असल्याने न्यायालयात दोघांनाही पुकारण्यात आले असता शिवराज देशमुख हे हजर होते. मात्र, आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे गैरहजर होते. तसेच तपासी अधिकारी अनिल गुजर देखील गैरहजर होते.
सुनावणी दरम्यान, धनंजय देशमुख यांनी न्यायालयाच्या आवारात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींना मरेपर्यंत फाशी हे आम्हाला ऐकायचे आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा वगळता सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. आज ते सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाच्या संपर्कात होते. यावेळी न्यायाधीशांनी आरोपींची नावे घेत त्यांचे नाव पुकारले. त्यांनी हात वर करण्याचे सुचविले असता वाल्मीक कराड यांनी हात जोडले. तर इतर आरोपींनी हात वर करून उपस्थिती दर्शविली.
न्यायाधीशांनी सर्व आरोपींची नावे वाचून दाखविल्यानंतर फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे नाव उच्चारताच ती सुद्धा बातमी होईल, अशी टिप्पणी न्यायाधीशांनी न्यायालयात हजर असलेल्या माध्यम प्रतिनिधींकडे पाहून केली.
न्यायालयाच्या परिसरात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी वार्तांकन करीत असताना कॅमेऱ्याच्या आड येणाऱ्या वकिलांना त्यांनी बाजूला होण्याची विनंती केली असता काही वकिलांनी माध्यम प्रतिनिधींशी हुज्जत घातल्याने काय काळ त्यांच्यामध्ये तू तू मैं मैं झाले.
आरोपींचे वकील :- आम्ही या प्रकरणी ॲडिशन-से दाखल करू. आम्हाला तपास यंत्रणांनी सादर केलेले आरोपींचे जबाब, व्हिडिओ आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मिळाले नाहीत.
सरकारी पक्षाचे वकील :- आरोपींच्या वकिलांना सादर केलेले सर्व पुरावे आणि कागद पत्रे यासह सर्व माहिती रीतसर दिली जाईल.
आरोपींचे वकील :- भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यानुसार घेतलेले जबाब व मकोका कलम १८ नुसार सादर केलेली सर्व माहिती हवी आहे. ती न मिळाल्याने पुढील तारीख द्यावी.
सरकारी वकील :- सर्व माहिती देण्यात येईल असे म्हणून ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी त्यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ न्यायाधीशांनी दाखविले.
या सर्व युक्तीवादानंतर न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी पुढील सुनावणी २६ मार्चरोजी होणार असल्याचे आदेश दिले.
सर्व माहिती सत्य काहे काय ? :- संतोष देशमुख हत्या प्रकरणी फिर्याद दाखल करणारे त्यांचे मेव्हणे शिवराज देशमुख न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना तपास यंत्रणेने केलेला तपास योग्य असल्याबाबत न्यायालयात लेखी स्वरूपात सादर करण्याबाबत सूचना दिल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. ते आज न्यायालयात हजर राहतील, अशी चर्चा होती. मात्र, ते हजर राहिले नाहीत.