

Santosh Deshmukh Murder Case
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, सोमवारी (दि.७ जुलै) बीडमधील विशेष मकोका न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड याच्यासह इतर आरोपींच्या मालमत्ता जप्तीबाबतच्या अर्जावर युक्तिवाद झाला. वाल्मीक कराड याचे खाते सील करण्याची कारवाई रद्द करावी, अशी आरोपीच्या वकिलाची मागणी आहे. वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसेच त्याची मालमत्ता जप्त कारवाई रद्द करण्याच्या अर्जावर २२ जुलै रोजी न्यायालय निर्णय देणार आहे.
वाल्मीक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर निकाल न्यायालय २२ जुलै रोजी देणार आहे, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा सरकारतर्फे अर्ज देण्यात आला होता. त्यावर सरकारी वकील कोल्हे यांनी युक्तिवाद केला.
कराडला नाशिक कारागृहात हलवणार का? यावर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, कराडला नाशिक कारागृहात हलवण्यासंदर्भातील मला माहिती नाही. हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे. वाल्मीक कराडला इतरत्र हलवण्यासंदर्भातला कुठलाही अर्ज न्यायालयात आलेला नाही. सध्या कराड बीड जिल्हा कारागृहात आहे.
वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्यासाठीचा अर्ज यापूर्वी दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद झाला. आजच्या सुनावणीदरम्यान बँक खाते तसेच मालमत्तेवर लावण्यात आलेले सील काढावे, अशी मागणी करण्यात आल्याचे आरोपीचे वकील विकास खाडे यांनी सांगितले. सदर बँक खाते तसेच सदरील मालमत्ता ही कोणत्याही गुन्ह्यातून मिळवलेली नाही. तसेच या गुन्ह्याचा आणि त्या मालमत्तेचा काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. दोषमुक्तीचा अर्ज तसेच मालमत्तेवरील सील हटवण्याबाबतच्या अर्जावर युक्तिवाद झाला असल्याचे खाडे म्हणाले.