

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस महानिरीक्षकांमार्फत आणि तेथील येथील गुन्हेगारी विश्वाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. दरम्यान, आज शनिवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार मस्साजोग गावात (Sharad Pawar Massajog visit) दाखल झाले. येथे त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. शरद पवार यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे, निलेश लंके, नेते राजेश टोपे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहिले.
''ही घटना अतिशय गंभीर आहे. बीड जिल्ह्यात न पटणारी घटना घडली. या प्रकरणाच्या खोलात जायला पाहिजे. खोलात गेल्यास वस्तुस्थिती समोर येईल. त्यांचा कुणाकुणासोबत संवाद झाला याची माहिती काढली पाहिजे','' असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे जे सूत्रधार आहे; त्याला पकडले पाहिजे. तुम्ही एकटे नाहीत आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, असा दिलासाही पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिला. राज्य सरकार आणि केंद्र सरकार जोपर्यंत या हत्याकांडाचा खोलात जात नाही; तो आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाच्या जबाबदारी आम्ही घेऊ, असेही आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले.
दरम्यान, शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.
या प्रकरणी लोकसभेत.खा. बजरंग सोनवणे आणि खा. निलेश लंके यांनी आवाज उठविला. तर विधानसभेत आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह इतर आमदारांनी आवाज उठविला आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. बीड जिल्हा हा जसा वारकरी संप्रदायाचा जिल्हा आहे. तसाच येथील ऊस तोड मजूर मोठ्या प्रमाणात साखर उद्योगात ऊस तोडीसाठी जात असतो. संतोष देशमुख हे मागील पंधरा वर्षां पासून ग्रामस्थांच्या सुख दुःखात सहभागी होत असत. ते एक कर्तव्यदक्ष सरपंच होते.
दरम्यान, त्यांच्या हत्येच्या तीन दिवसांपूर्वी पवन ऊर्जा प्रकल्पावर झालेल्या खंडणी मागणीच्या कारणावरून झालेले भांडण हे त्यांच्या हत्येचे मूळ कारण आहे. याच कारणामुळे त्यांची हत्या झाली. म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मीक कराड यांच्या पर्यंत हे कनेक्शन असल्याचे त्यांनी कराड यांचे नाव न घेता सांगितले. तसेच मारेकऱ्यांची आणि त्यांच्या सुत्रधारांची प्रचंड दहशत आहे. संतोष देशमुख हे आता परत येवू शकत नाहीत; परंतु आता त्यांचे कुटुंब हे एकटे नसून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला. तर संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही ते घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला विष्णू चाटे याला आता पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील अटकेतील संशयित आरोपींची संख्या ४ झाली आहे. तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या हत्याकांडाचे कनेक्शन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यापर्यंत असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधानसभेत बोलताना सांगितले की, बीड जिल्ह्यात अराजक निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मात्र, ही अराजकता संपविली जाईल, जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्याची मागणी केली. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर दिले.