परभणी कोठडी मृत्यू, बीड सरपंच हत्येची न्यायालयीन चौकशी होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसFile Photo
Published on
Updated on

नागपूर : परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीच्या तोडफोडीनंतर झालेली जाळपोळ आणि आंदोलन प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला नसल्याचे सांगतानाच कोणाच्या मनात संशय राहू नये यासाठी सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याप्रकरणी जबाबदार पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या निलंबनाची घोषणाही फडणवीस यांनी केली. तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी पोलिस महानिरीक्षकांमार्फत आणि तेथील येथील गुन्हेगारी विश्वाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल बीडच्या पोलिस अधीक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

पोलिस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला नाही. कोठडीतील संपूर्ण व्हिडीओ फुटेजमध्येही मारहाण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दंडाधिकार्‍यांपुढे सूर्यवंशी यांनी मारहाण झाली नसल्याचा जबाब दोनदा दिला होता. सोमनाथच्या वैद्यकीय अहवालात त्याला श्वसनाचा जुना आजार होता, असा उल्लेख आहे. मात्र, या प्रकरणात कोणताही संशय राहू नये म्हणून सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर करण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.

भारतीय संविधान सर्वांचेच

भारतीय संविधान हे आपल्या सर्वांचे आहे. संविधानाच्या संदर्भात झालेला अवमान हा प्रत्येक भारतीयाचा अवमान आहे. त्याला कुठल्या जाती धर्माशी जोडून भेद करू लागलो, तर आपल्यापैकी कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याच्या लायकीचे असणार नाही. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी अशा प्रकरणी संयमाने तणाव कमी होईल असा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीबाबतची घटना कोणत्या जाती धर्मातून घडलेली नाही. एका मनोरुग्णाने केलेल्या कृत्याने संपूर्ण शहराचे स्वास्थ्य खराब केले. राज्यात कायदा सुव्यवस्था राहू नये, असे काही लोकांना वाटते. त्यासाठी काही शक्ती जाती-जातीत दंगे पसरविण्याचा प्रयत्नात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बीड जिल्ह्यातील अराजक संपविणार

बीड जिल्ह्यात अराजक निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. मात्र, ही अराजकता संपविली जाईल, जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्याची मागणी केली. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.

या घटनेची पार्श्वभूमी तपासली असता, बीडमध्ये आवाडा ग्रीन एनर्जी यांनी पवनचक्कीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात तिथे कामे केली जात आहेत. काही लोक ही कामे आम्हालाच द्या, आम्ही सांगू त्याच किमतीत द्या आणि द्यायची नसल्यास आम्ही मागू तेवढी खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेत वावरताना दिसत आहेत. यातीलच एक प्रकार मस्साजोग येथे घडला, मुख्यमंत्र्यांनी या हत्याकांडाचा घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला. या हत्येचा मुख्य सूत्रधार कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही फडणवीस यांनी केली.

बीडच्या पोलिस प्रशासनालाही फटकारले

बीडमध्ये ज्याप्रकारे अराजकाचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत आहे ते अतिशय चुकीचे आहे. यात पोलिस प्रशासनाचादेखील दोष आहे. एखादी फिर्याद नोंदवत असताना त्याची वस्तुस्थिती काय आहे हे तपासले पाहिजे. यापुढे असा निर्ढावलेपणा सहन केला जाणार नाही. बीड जिल्ह्यात अशा प्रकारे गुन्हेगारी करणार्‍यांची पाळेमुळे आम्ही खोदून काढू. या सगळ्या प्रकरणांत कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल बीडच्या पोलिस अधीक्षकांवर बदलीची कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.

दहा लाख नकोत, आम्हाला न्याय हवा : मृत सूर्यवंशीच्या आईची मागणी

परभणी हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले निवेदन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्र्यांनी माझा मुलगा आजारी असल्याचे सांगितले. त्याला कोणताही आजार नव्हता. मला त्यांचे 10 लाख नकोत, मला केवळ न्याय हवा आहे, असे त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news