

Sand mafia attacks Tehsildar's team
आष्टी, पुढारी वृत्तसेवाः तहसीलदार वैशाली पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सिना नदीपात्रात संगमेश्वर मंदिराजवळ (ता. आष्टी) अवैध गौण खनिज व वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारीवर महसूल पथकाने छापा टाकला. या कारवाईत ५१ लाख ३४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात एक विना नंबरची जेसीबी, स्वराज कंपनीचे तीन ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि ३० ब्रास वाळू यांचा समावेश आहे. कारवाई दरम्यान वाळू माफियांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तलाठी सचिन विठ्ठल तेलंग यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार पाटील यांच्यासह तलाठी राजकुमार आचार्य, प्रविण शिंदे, स्नेहल थेटे, योगेश गोरे, मंडळ अधिकारी सुभाष गोरे, महसूल सहाय्यक दिलीप गालफाडे, महसूल शिपाई कुंदन बावरे तसेच पंच सुरज कोकणे व धनु गावडे धावडे यांनी सिना नदीच्या पात्रात कारवाई केली. पथक जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करून आष्टी तहसील कार्यालयाकडे येत असताना, क्रेटा, बोलेरो आणि स्विफ्ट कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी गाडी आडवी लावून पथकावर हल्ला केला.
जेसीबी चालकाने तलाठी सचिन तेलंग यांच्यावर वाहन चढवण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी तलाठी प्रविण शिंदे यांना दमदाटी करून एक ट्रॅक्टरचे हेड जबरदस्तीने पळवून नेले. शेवटी पथकाने जेसीबी चालक महेश संभाजी आस्वर (रा.वाकी) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे हे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.