

गेवराई : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची थेट मदत त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. जर सरकारची नियत स्वच्छ असेल तर हे देणे कठीण नाही. मात्र, सरकार झोपेत राहून फक्त सोंग घेणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दांत आ. रोहित पवार यांनी बुधवारी (दि.१) सरकारला इशारा दिला.
अतिवृष्टी आणि पुरामुळे गेवराई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (दि.१) तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार रोहित पवार यांनी बाधित गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. शेतजमिनीतील पिकांचे झालेले प्रचंड नुकसान, घरांची पडझड, वाहलेले जनावरं आणि नागरिकांचे हाल पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेवराई तालुकाध्यक्ष अण्णासाहेब राठोड, हिरापूरचे सरपंच बाबुलाल पवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देण्याचा निर्धार आमदार पवार यांनी यावेळी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघावे, पुरग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळावी आणि सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.