

'Records' pose a hurdle in the inquiry into bogus teacher recruitment
बीड : पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात चौकशीची व्याप्ती वाढत असतानाच आता आवक-जावक नोंदवही आणि संबंधित अभिलेखच उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आल्याने चौकशीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. काही अभिलेखांतील पाने फाटलेली आढळल्याचेही सांगण्यात येत असल्याने या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.
बोगस शिक्षक भरती प्रकरणातील विविध विभागांमध्ये गैरप्रकार झाल्याचे तपासात समोर आल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणातील आवक-जावक नोंदवहीमध्ये मोठ्या प्रमाणावर खाडाखोड व फेरफार झाल्याचे निदर्शनास आल्याने छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने बीडमध्ये येऊन संबंधित अभिलेखांची तपासणी सुरू केली आहे.
चौकशीदरम्यान समितीने संबंधित आवक-जावक रजिस्टर, नोंदवही तसेच काही विशेष खतावणी आणि संबंधित कागदपत्रांची मागणी केल्याचे सांगण्यात येते. मात्र, काही अभिलेख उपलब्ध नसल्याचे तसेच उपलब्ध अभिलेखांमधील काही पाने फाटलेली असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या नोंदींच्या आधारे गैरप्रकाराची सत्यता तपासायची, त्याच नोंदी उपलब्ध नसल्यास चौकशी पुढे कशी जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यापूर्वीही या प्रकरणात आवक-जावक क्रमांक आणि नोंदवहीमध्ये खाडाखोड झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशी समितीने संबंधित कागदपत्रांची मागणी करूनही त्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने चौकशीसमोर अडचण निर्माण झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, आवक-जावक रजिस्टरमधील नोंदींची पडताळणी हा या प्रकरणातील महत्त्वाचा भाग असताना मूळ रजिस्टर किंवा संबंधित पाने उपलब्ध नसणे ही बाब गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, तक्रारदार इंजि. सादेक इनामदार यांनी समितीकडे चौकशीच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता, चौकशीसाठी आवश्यक असलेले काही अभिलेख उपलब्ध नसल्याचे आणि काही उपलब्ध नोंदवहीची पाने फाटलेली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, लवकरच चौकशीचा अहवाल तयार करून देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे इनामदार यांनी नमूद केले.
दरम्यान, शिक्षण विभागातील गैरप्रकारावर कारवाई करण्याऐवजी वरिष्ठ पातळीवरून प्रकरणाला वेगळे वळण देऊन त्यावर पांघरूण घालण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप तक्रारदार इंजि. सादेक इनामदार यांनी केला आहे. मात्र, या आरोपाला संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी अथवा समितीची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
त्यामुळे आता चौकशी समिती आपल्या अंतिम अहवालात नेमके काय नमूद करते, अभिलेख उपलब्ध नसण्याची जबाबदारी कोणावर निश्चित करते आणि आवक-जावक नोंदवहीतील कथित फेरफाराबाबत काय निष्कर्ष काढते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. अभिलेख गायब की पाने फाटली? नोंदींमध्ये फेरफार कोणी केला? आणि त्याची जबाबदारी कोणाची? या तीन प्रश्नांची उत्तरे चौकशीच्या अहवालातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
दोषींवर कारवाई कधी ?
बोगस शिक्षक भरती प्रकरणातील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असताना, तपासासाठी आवश्यक असलेले अभिलेखच उपलब्ध नसतील तर त्याची जबाबदारी निश्चित होणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. नोंदवहीतील पाने नेमकी कधी, कोणत्या परिस्थितीत आणि कोणाच्या जबाबदारीत फाटली किंवा गायब झाली, याचाही स्वतंत्र तपास होणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. या प्रकरणात दोषी अधिकारी-कर्मचारी कोण, अभिलेखांमध्ये फेरफार कोणी केला आणि महत्त्वाचे दस्तऐवज उपलब्ध नसण्यामागे नेमके कारण काय, याचा छडा चौकशी समितीच्या अहवालातून लागण्याची अपेक्षा आहे