

Farmer Attacked Ashti
कडा : आष्टी तालुक्यातील देवळाली शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी देविदास टकले यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची आमदार सुरेश धस यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी रामलिंग वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून संभाव्य मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांना शेतीची कामे तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी दररोज शिवारात जावे लागते. मात्र, वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. विशेषतः शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वनविभागाने या घटनेकडे नियमित कारवाई म्हणून न पाहता अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार धस यांनी स्पष्ट केले.
संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तातडीने विशेष पथके तैनात करावीत. परिसरात पिंजरे लावणे, कॅमेरे बसविणे आणि आधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने शोधमोहीम राबवावी. नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
देविदास टकले यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. वनविभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
दरम्यान, वन्यप्राण्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. एकट्याने शेतात जाणे टाळावे तसेच वन्यप्राण्याच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांचे प्राण वाचविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही होत आहे.