

केज : बचत गटांना अल्प व्याजदराने कर्ज देऊन त्यांची मासिक हप्त्यात परतफेड करणाऱ्या फायनान्स कंपन्यांचे पेव फुटले आहेत. अशाच एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या फील्ड ऑफिसरने महिलांकडून घेतलेले कर्जाचे हप्ते खात्यात जमा न करता फायनान्स कंपनीला १६ लाखाचा चुना लावला आहे.
या बाबतची माहिती अशी की, भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन लि. शाखा केज येथे फील्ड ऑफिसर या पदावर काम करीत असलेले अरबाज रशीदखाँ पठाण (वय २७ वर्षे, रा. अजीजपुरा, केज जि. बीड) यांनी दि. २३ ऑगस्ट २०२३ ते दि. ३ मे २०२४ या कालावधीत महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडी पोटी ७९ महिलांकडून १६ लाख ९ हजार ८६३ रु. जमा केले. परंतु ते पैसे त्यांनी भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन या कंपनीच्या खात्यात जमा केले नाहीत.
ही बाब कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर फसवणूक झाल्याप्रकरणी भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन लिमिटेड शाखा केजचे शाखाधिकारी श्रीहरी मुळे यांनी २९ ऑक्टोबर रोजी केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या दिलेल्या तक्रारी वरून फील्ड ऑफिसर अरबाज रशीदखाँ पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे हे करीत आहेत.