

किट्टी आडगाव : माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री पुरुषोत्तम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मागील सहा वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे भगवान श्री पुरुषोत्तम प्रभू पत्र्याच्या शेडमध्ये विराजमान आहेत. मात्र, आता मंदिराचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने 2027 च्या अखेरीस भगवान पुरुषोत्तमाची मूळ मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभूंच्या मूळ मंदिरातील दर्शनाची आतुरतेने वाट पाहणार्या भाविकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
भारतभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथील भगवान श्री पुरुषोत्तम देवस्थानाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अधिक मासात या तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त होते. अधिक मासाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे पुरुषोत्तमपुरी हे धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते.
भगवान श्री पुरुषोत्तम मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने मंदिर परिसराचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने भगवान श्री पुरुषोत्तम मंदिर आणि सहालक्षेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या दोन्ही मंदिरांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, 2027 च्या अखेरीस मंदिराचे काम पूर्ण होऊन भगवान पुरुषोत्तमाची मूळ मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याचे नियोजन आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे सध्या भाविकांना पत्र्याच्या शेडमध्ये विराजमान असलेल्या प्रभूंचे दर्शन घ्यावे लागत आहे. गोदावरी नदीच्या घाटापासून दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभे राहावे लागते. विशेषतः अधिक मास, धार्मिक उत्सव आणि यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत मूळ मंदिराचे काम पूर्ण होऊन प्रभूंची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंदिरानंतर गोदावरी घाटाचा विकास
भगवान श्री पुरुषोत्तम मंदिर आणि सहालक्षेश्वर महादेव मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात गोदावरी नदीच्या घाटाच्या विकासकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. गोदावरी घाटाचा विकास झाल्यास भाविकांना स्नान, धार्मिक विधी आणि दर्शनासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुरुषोत्तमपुरी तीर्थक्षेत्राच्या सौंदर्यात आणि धार्मिक वैभवात आणखी भर पडणार आहे.
2027 च्या अखेरीस भगवान श्री पुरुषोत्तमाची मूळ मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती देवस्थान मंदिर समितीचे अध्यक्ष विजय गोळेकर यांनी दिली. मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण होऊन प्रभू पुन्हा आपल्या मूळ गाभार्यात विराजमान होण्याचा क्षण भाविकांसाठी अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे. सहा वर्षांची प्रतीक्षा संपून पुरुषोत्तमपुरीत पुन्हा भक्तीचा आणि धार्मिक उत्साहाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.