

धारूर : धारूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये तीन सराफी दुकाने आणि एका इलेक्ट्रिक दुकानाचा समावेश आहे. मात्र, पहारेकर्याच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव उधळला गेल्याने मोठी चोरी टळली. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यालगत हनुमान मंदिराच्या पाठीमागील दोन सराफी दुकाने, लाकडी मशीनसमोरील एक सराफ दुकान आणि एका इलेक्ट्रिक दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश केल्यानंतर मौल्यवान वस्तू ठेवलेली कपाटे फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून सुरू होता.
दरम्यान, रात्रीच्या वेळी पहारा देणार्या गुरख्याला संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्याने तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. पहारेकर्याच्या प्रसंगावधानामुळे व्यापार्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले.
शहरातील मध्यवर्ती भागात एकाच रात्री चार दुकानांचे शटर फोडण्याची घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, शहरातील रात्रीची गस्त वाढवावी आणि उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.