

Prisoners beaten by Superintendent Gaikwad
बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा कारागृह अधीक्षक पिट्रस गायकवाड हे धर्मांतर करण्यासाठी कैद्यांना मारहाण करतात, मानसिक त्रास देतात. अनेक मुस्लिम कैद्यांना देखील त्यांनी त्रास दिला असल्याचा खळबळजनक आरोप कल्याण भावले याने शनिवारी पत्रकार परिषदेत केला. कल्याण भावले हा दोन दिवसांपूर्वीच बीडच्या कारागृहातून जामीनावर बाहेर आला असून त्यानंतर त्याने हे आरोप केले. तर ज्या रवींद्र गायकवाड याच्या खुनाचा आरोप पिट्रस गायकवाड यांच्यावर आहे, त्याच्या पत्नीनेदेखील बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
कारागृह अधीक्षक पिट्रस गायकवाड यांच्याकडून कैद्यांचे धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला जात आहे, या ठिकाणचे महापुरुषांचे छायाचित्र काढून टाकण्यात आले तसेच अनेक वर्षांपासून सुरू असलेले भजनदेखील बंद करण्यात आल्याची तक्रार आ. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
या प्रकरणाची चौकशी कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. शनिवारी कल्याण भावले या जामीनावर सुटलेल्या आरोपीने गायकवाड मारहाण करत असल्याचा आरोप केला. तसेच चौकशीसाठी जी समिती आली होती, त्यांच्यापुढे आपण म्हणणे मांडणार होतो, परंतु मला त्यांच्यापर्यंत जाऊ दिले नाही असे देखील त्याने सांगितले.
जळगाव येथील कारागृहात गायकवाड यांच्यासह इतर पाचजणांच्या मारहाणीत २०२०ला रवींद्र गायकवाड या कैद्याचा मृत्यू झाला होता. तक्रार मागे घे म्हणत मीना गायकवाड यांच्यावर दबाव टाकण्याचा, पैसे देण्याचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आता मीना गायकवाड यांनी केला आहे. पिट्रस गायकवाड याने मला चाळीस लाखांची ऑफर दिली होती. मला लोकांकडून धमक्यादेखील येत आहेत, परंतु मी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे मीना गायकवाड यांनी सांगितले.