

11 students of Warkari Educational Institute brutally beaten
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा: परळी शहरातील ४० फूट रोडवरील सिद्धेश्वर नगर परिसरात असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत शनिवारी सायंकाळी दोन इसमांनी अक्षरशः धुडगूस घातला. नर्मदेश्वर गुरुकुलम् या निवासी वारकरी शिक्षण संस्थेतील ११ विद्यार्थ्यांना निर्दय मारहाण करताना या दोघांनी संस्थाचालकाच्या वृद्ध वडिलांवरही हल्ला करून त्यांचे डोके फोडले. या घटनेने परळीत एकच खळबळ उडाली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नर्मदेश्वर गुरुकुलम् ही वारकरी परंपरेवर आधारित निवासी शिक्षणसंस्था असून, येथे सध्या ४२ विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेत असतानाच शालेय शिक्षणही घेत आहेत. सहामाही परीक्षा सुरू असल्याने काही विद्यार्थी पेपर देऊन गुरुकुलात परतत असताना ही घटना घडली.
स्थानिक रहिवासी दिनेश रावसाहेब माने (रा. चाळीसफुटी रोड, परळी वै.) व बाळु बाबुराव एकिलवाळे (रा. सिद्धेश्वर नगर, परळी वै.) या दोघांनी रस्त्यात दोन विद्यार्थ्यांना थांबवून "पेपर दाखवा" अशी मागणी केली. विद्यार्थ्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना धक्काबुकी करून मारहाण केली. विद्यार्थी भयभीत होऊन गुरुकुलात धावत पोहोचले, मात्र आरोपी त्यांच्या पाठोपाठ आत घुसले आणि कंबरेचा बेल्ट व काठीने विद्यार्थ्यांना अंधाधुंद मारहाण केली.
यात ११ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या हातापायाला व डोक्याला जखमा झाल्या आहेत. एवढ्यावरच ते थांबले नाहीत काय प्रकार चालला आहे हे पाहण्यासाठी वडील बालासाहेब शिंदे यांनाही आरोपींनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. सध्या त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ह.भ.प. अर्जुन बालासाहेब शिंदे, संचालक, नर्मदेश्वर गुरुकुलम् यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात (संभाजीनगर पोलिस ठाणे) फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी दिनेश माने व बाळु एकिलवाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शहरात संतापाची लाटया घटनेमुळे परळी शहरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणसंस्थेत घुसून केलेल्या या अमानुष मारहाणीचा विविध सामाजिक व धार्मिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.