

Police arrest gang involved in bike theft
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना अटक केली आहे. याबरोबरच सतरा दुचाकी, सोळा चेसीस आणि तीस इंजिनदेखील जप्त करण्यात आले असून ही कारवाई बुधवारी करण्यात आली. या आरोपींकडून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना समोर येणार आहेत.
सय्यद अब्रार सय्यद जैनुद्दीन (रा. एमआड शहा शौकत कॉलनी, रेल्वे स्टेशन, छत्रपती संभाजीनगर), सय्यद इमदाद हुसैन अरशद हुसैन (रा. मासूम कॉलनी, मोमीनपुरा, बीड), शेख आसेम शेख मझर (रा. टिपू सुलतान चौक, माऊली मंगल कार्यालय शेजारी, नेकनूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.
गेवराई शहरातून सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिस निरीक्षक किशोर पवार व त्यांचे सहकारी या चोरट्यांच्या मागावर होते. या दरम्यान त्यांना एकाजणावर संशय आल्याने पोलिसांनी त्याबाबत माहिती एकत्रित करणे सुरू केले होते.
त्यातून जो प्रकार समोर आला तो अतिशय धक्कादायक होता. छत्रपती संभाजीनगर येथील सय्यद अनार हा बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली यासह इतर जिल्ह्यांत दुचाकी चोरी करायचा, तो बीडमध्ये आणायचा. बीड येथील सय्यद इमदाद हा त्याच्यासह नेकनूर येथे जाऊन भंगारचा व्यापार करणाऱ्या शेख आसेम याच्याकडे ही दुचाकी विकायचा, गेवराई पोलिसांनी दुचाकी चोरीची ही साखळी समोर आल्यानंतर सर्वात आधी सय्यद अब्रार याला उचलले, त्यानंतर सय्यद इमदाद व शेख आसेम यांना अटक केली. त्यांचा एक साथीदार अद्यापही फरार आहे. भंगारचा व्यापार करणारा शेख आसेम याच्याकडून तब्बल सतरा मोटारासयकल, सोळा चेसीस व तीस इंजिन असा एकूण ५० पेक्षा जास्त मोटारसायकलचे पार्ट जप्त केले आहेत. याची सरासरी पंचवीस लाख रुपये किंमत असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन तासांत व्हायचे दुचाकीचे भंगार
सय्यद अब्रार याने दुचाकी चोरी केल्यानंतर बीडमधील सय्यद इमदाद हुसैन व अन्य एका साथीदाराच्या माध्यमातून नेकनूर येथे पोहचत शेख आसेम याच्याकडे ती दुचाकी सुपूर्द करायचे. त्यानंतर तो अवघ्या दोन तासांत नव्या कोऱ्या दुचाकीचे अक्षरशः भंगार करायचा. यातील विक्री करण्यासारखे पार्ट बाजूला करायचे आणि चेसीस भंगारमध्ये घालायचा.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पवार, सपोनि दीपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप आढाव, उपनिरीक्षक निशीगंधा खुळे, सुरेश पारधी, श्रीमंत उबाळे, रवींद्र राऊत, अशोक हंबर्डे, कल्याण राठोड, घोलप, राजू सांगळे, ऋषी पोट, महादेव पाटोळे यांनी केली.