

Ambajogai Parmeshwar Gitte Hunger Strike
अंबाजोगाई : गांधीवादी विचारवंत, संशोधक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंबाजोगाई येथे पत्रकार परमेश्वर गित्ते यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा १९ वा दिवस उजाडूनही केंद्र सरकारकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात आले.
उपोषणादरम्यान बोलताना परमेश्वर गित्ते म्हणाले, एका संशोधकाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित व्यक्तिमत्त्वाचा अशा प्रकारे अवमान होणे दुर्दैवी आहे. लोकशाही व्यवस्थेत आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि त्यांच्या जीविताची दखल घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी दूरध्वनीद्वारे समर्थन व्यक्त करत आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन केले. "आम्ही माणूस म्हणून तुमच्या सोबत आहोत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे लाक्षणिक उपोषण पार पडले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी, मराठा सेवा संघ, लोक जनशक्ती पार्टी, समाजवादी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांसह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला.
उपोषणस्थळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्रा. कल्पना पाटील, ॲड. आनंदराव जगतकर, दिलीपदादा सांगळे, ॲड. माणिकराव बावणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे पदाधिकारी शिवाजी कुलकर्णी, अशोक हेडे, ॲड. इस्माईल गवळी, लोजपाचे राजेश वाहुळे, वंचित बहुजन आघाडीचे गोविंद मस्के, समाजवादी पक्षाचे राजेश परदेशी, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय आंबेकर, डॉ. राजेश इंगोले, अभय जोशी, ॲड. पी. एम. खामकर, डॉ. नागेश जोंधळे, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता वालेकर, सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड. बाबुराव तिडके, नगरसेवक अकबर पठाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी केंद्र सरकारने आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी तसेच सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली.
"मानवता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी हे आंदोलन करण्यात आले असून, माणूस जगला पाहिजे हीच यामागची भूमिका आहे," असे पत्रकार परमेश्वर गित्ते यांनी सांगितले.