Shravan Mahotsav Parli : शासनाचा ‘श्रावण महोत्सव’ रसिकांविनाच; दर्जेदार कार्यक्रमाचा प्रसिद्धीअभावी फज्जा!

प्रसिद्धी आणि समन्वयाअभावी लाखोंचा शासकीय निधी पाण्यात गेल्याची जोरदार चर्चा
Shravan Mahotsav Parli
Shravan Mahotsav Parlipudhari photo
Published on
Updated on

परळी वैजनाथ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परळी येथे आयोजित करण्यात आलेला ‘श्रावण महोत्सव’ रसिकांविना पार पडल्याने शासकीय यंत्रणेची अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. केवळ शासनाचे परिपत्रक आले म्हणून हा कार्यक्रम अत्यंत घाईगडबडीत उरकण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, प्रसिद्धी आणि समन्वयाअभावी लाखोंचा शासकीय निधी पाण्यात गेल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

'श्रावण महोत्सवा'अंतर्गत 'स्वरविहार' या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात प्रा. राजेश सरकटे यांच्यासह नामवंत कलावंतांनी सुरेल सादरीकरण केले. मात्र, या दर्जेदार कार्यक्रमाची साधी पूर्वप्रसिद्धी करण्याची तसदीही स्थानिक प्रशासनाने किंवा सांस्कृतिक विभागाने घेतली नाही. फलकबाजी, स्थानिक वृत्तपत्रे, सोशल मीडिया अथवा प्रमुख चौकांत दवंडी देऊन माहिती पोहोचवणे तर दूरच, पण शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना या आयोजनाची साधी भणकही लागू दिली गेली नाही.

Shravan Mahotsav Parli
Beed Crime : १५ लाखांचा गांजा जप्त, एकाला घेतले ताब्यात

शासकीय कामाची कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी व निधीचा खर्च दाखवण्यासाठीच हा सारा सोपस्कार पार पाडल्याचा आरोप आता होत आहे. कलावंतांनी आपली कला उत्तमरीत्या सादर केली, परंतु ती ऐकण्यासाठी सभागृहात खुर्च्या शिवाय कोणीही उपस्थित नव्हते. जनतेच्या करातून जमा झालेल्या लाखोंच्या निधीतून चालणारा उपक्रम रसिकांपर्यंत पोहोचवण्या ऐवजी केवळ ‘उरकावा’ म्हणून उरकल्याने शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

कागदी घोड्यांवर नियोजन?

शासकीय परिपत्रकाची अंमलबजावणी करायची म्हणून घाईघाईत कार्यक्रमाची तारीख ठरवायची, कार्यक्रम पार पडल्याचे फोटो काढून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवायचा आणि बजेट मंजूर करून घ्यायचे, याच कुचकामी कार्यपद्धतीमुळे हा श्रावण महोत्सव पूर्णपणे निष्फळ ठरला. आगामी काळात तरी सांस्कृतिक विभागाने अशा ‘बंद खोलीतील’ आयोजनांचा सोस सोडून खऱ्या अर्थाने रसिकांपर्यंत पोहोचणारे नियोजन करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया परळीतील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Shravan Mahotsav Parli
Ambadas Danve : भाजप-शिवसेनेच्या रझाकारांविरोधात आता रस्त्यावर उतरा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news