

Theft at the main post office in Parli
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा
गेल्या दीड महिन्यापूर्वी परळीच्या मुख्य डाक घरामध्ये आधार केंद्रातील संगणक, स्कॅनर व अन्य साहित्याची अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. मात्र आज (दि.२९) सकाळी आश्चर्यकारकरित्या पोस्ट ऑफिसच्या बाजूच्या बीएसएनएल कार्यालयाच्या मोकळ्या जागेत हे साहित्य एका पोत्यात आढळून आले आहे. तब्बल 50 दिवसानंतर या चोराला उपरती झाली का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेत आहे.
चोराने जिथून साहित्य नेले त्याच ठिकाणी परत हे साहित्य आणून टाकले असल्याचा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान 50 दिवसानंतर हे साहित्य परत आणून टाकले, तर हे साहित्य चोरण्यामागचा चोरट्याचा नेमका उद्देश काय होता? याबाबत आता तर्क वितर्क लढवले जात आहेत.
परळीतील मुख्य डाकघरातील चोरीस गेलेले आधार केंद्राचे साहित्य पोस्टाच्या बाजूलाच असलेल्या बीएसएनएल कार्यालय आवारात आढळले आहे. परळीतील मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पन्नास दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांने आधार केंद्राचे संगणक, आय स्कॅनर आणि अन्य साहित्याची चोरी केली होती.
या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांचा तपास सुरु होता. मात्र पन्नास दिवसानंतर चोरट्याने आधार केंद्राचे सीपीयू, कीबोर्ड, आय स्कॅनर, थंब स्कॅनर, जीपीएस असे साहित्य एका पोत्यात भरुन आणून टाकले आहे.
ही बाब नागरिकांच्या लक्षात येतात याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतले आहे. पन्नास दिवसांपासून हे साहित्य कुणी चोरले होते? विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये इतर साहित्य असताना फक्त आधार केंद्राचेच साहित्य चोरून नेले होते. आता पन्नास दिवसात त्याचा काही दुरुपयोग चोरट्यांकडून करण्यात आला आहे का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. या घटनेचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत.