

Kidnapping case reality exposed
केज : संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान उचलण्यासाठी बँकेत आलेल्या एका ६० वर्षाच्या महिलेचे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास केज येथील बस स्टँड वरून एका बसमध्ये बसवून अज्ञात महिलांनी अपहरण केल्याची बातमी समजली होती. यानंतर गुन्हा दाखल झाल्या पासुन अवघ्या पाच तासात केज पोलिसांनी दीडशे किमी अंतरावर असलेल्या त्या कथित अपहरण झालेल्या महिलेचा तपास करून तिला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील लव्हुरी येथील अनुसया युवराज शिनगारे या दि. २६ एप्रिल रोजी सकाळी केज येथील महाराष्ट्र बँकेत त्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान उचलण्यासाठी आल्या होत्या. दुपारी ४:०० वाजले तरी अनुसया शिनगारे या घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा बापू शिनगारे यांनी त्यांना फोन केला असता त्या म्हणाल्या की, त्या बँकेतील कामकाज आटोपून त्या आपल्या गावी जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर आल्या असता काही अनोळखी महिलांनी त्यांचे एस. टी. बस मधून अपहरण करून धाराशिवच्या दिशेने घेवून गेल्या आहेत. तसेच त्यांचे अपहरण करून त्यांना ज्या ठिकाणी ठेवले आहे ते निर्जन ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले.
या माहितीवरून त्यांचा मुलगा बापू शिनगारे यांनी केज पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ च्याच सुमारास आईचे अपहरण करण्यात आले असल्याची फिर्याद दिली होती. मुलाच्या तक्रारी वरून अज्ञात अपहरणकर्त्या विरुध्द केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांनी आपसात चर्चा केली आणि तपासाची दिशा ठरविली. पोलिसांनी कथित अपहृत महिला अनुसया शिनगारे यांचे मोबाईल लोकेशन घेतले असता ते सी-टाईपचे लोकेशन मिळाले.
सी-टाईपच्या लोकेशन आधारे पत्ता शोधणे खूप अवघड काम असते. कारण सी-टाईपचे लोकेशन म्हणजे मोबाईल ज्या टॉवरच्या परीघ क्षेत्रात कार्यान्वित असेल ते असते. असे लोकेशन हे टॉवरच्या १० किमी परीघा पेक्षा जास्त मोठे देखील असू शकते. त्यामुळे ते ठिकाण शोधणे अवघड असते. मात्र या कामगिरीवर पाठविलेले पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत काळकुटे आणि महिला पोलिस नाईक मनीषा जाधव यांनी सुता वरून स्वर्ग गाठण्या सारखे अवघड काम सुरू केले. अनुसया शिनगारे यांचे लोकेशन हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या माहिती आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत काळकुटे आणि महिला पोलिस मनीषा जाधव यांनी खाजगी वाहनाने पंढरपूर गाठले आणि तोकड्या माहितीच्या आधारे अनुसया शिनगारे यांचा ठावठिकाणा शोधला.
पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत काळकुटे आणि महिला पोलिस मनीषा जाधव यांनी अनुसया शिनगारे यांना पंढरपूर येथील एका निर्जन ठिकाणाहून ताब्यात घेवून चौकशी केली असता या बनावट अपहरण प्रकरणाची माहिती उघड झाली. अनुसया शिनगारे यांचे कोणी अपहरण केले नव्हते तर वाढत्या वयामुळे त्यांचा स्वतःच्या मनावर ताबा न राहिल्यामुळे त्या स्वतःच केज येथील बस स्टँड वरून पंढरपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या आणि त्या पंढरपूर येथे गेल्या. दहा वर्षापूर्वी त्यांनी या परिसरात ऊस तोडणी काम केले असल्याने त्यांना हा परिसर ओळखीचा होता. त्या नंतर त्यांना घरातून फोन आल्या नंतर त्या गावापासून सुमारे दीडशे किमी दूर आल्याचे जाणवल्याने त्यांनी फोन वरून त्यांच्या मुलाला आणि पोलिसांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे पोलीस यंत्रणेची झोप उडाली होती.
या कथित आणि बनावट अपहरण नाट्याचा अवघ्या पाच तासात तपास करणाऱ्या पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत काळकुटे आणि पोलीस नाईक मनीषा जाधव यांच्यासह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील सन्मान व कौतुक करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.