

परळी : परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीला स्पस्ट बहुमत मिळाले असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पद्यश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह 25 नगर सेवक बहुमताने निवडून आले आहेत. महायुतीच्या या अभूतपूर्व यशामुळे परळीकर मुंडे बंधू-भगिनी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची प्रचिती नागरिकांनी आपल्या मतातून दाखवून दिली.
नगर परिषद निवडणूक होणार हे जाहीर होताच उतावीळ कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. काहींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुकीत आपला जीव ओतून काम केले. महायुती विरुद्ध महाआघाडी अशी सरळ सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पस्ट असताना ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे पहावयास मिळाले आणि काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) यांनी स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याने सरळ सरळ मताची फूट होऊन महायुतीचा उमेदवार निवडुन येणार हे चित्र निवडणुकीच्या पूर्वीच स्पष्ट झाले होते.
आज निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पद्यश्री बाजीराव धर्माधिकारी ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून नगरसेवक पदाकरिता रिंगणात असलेले महायुतीचे 25 नगरसेवक हे विजयी झाले आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत एकूण 35 पैकी महायुती च्या भाजप 7, राष्ट्रवादी (अ.प.गट) 16, शिवसेना 2 असे 25 नगर सेवक निवडुन आले आहेत. तर उर्वरित, एमआयएम 1, काँग्रेस 1, अपक्ष 6, राष्ट्रवादी (श.प.गट) 2 असे उमेदवार निवडून आलेले आहेत. महायुतीच्या या यशानंतर विजयी उमेदवारांनी ना.पंकजा मुंडे, आ.धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष केला.