

नितीन थोरात
वैजापूर : कौटुंबिक वादातून रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना तालुक्यातील बळ्हेगाव येथे उघडकीस आली आहे. पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या नानासाहेब रामजी दिवेकर (वय ४८) यांची सख्ख्या लहान भावानेच झोपेत असताना धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये पुरल्याचा थरारक प्रकार रविवारी (दि.४) रोजी दुपारी उघडकीस आला.
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नानासाहेब यांचा शोध सुरू असताना, हा प्रकार समोर येताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. १ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून नानासाहेब दिवेकर बेपत्ता असल्याची तक्रार शिऊर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपास पुढे जात असतानाच, हा बेपत्ता प्रकरणाचा धागा थेट निर्घृण हत्येपर्यंत पोहोचला.
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग आला. उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब आणि पोहेकॉ किशोर अघाडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हातात घेतली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार नानासाहेब यांचा खून त्यांचा लहान भाऊ लहानु रामजी सातदिवे (दिवेकर) (रा. बळ्हेगाव) याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दि. २ जानेवारी रोजी रात्री कौटुंबिक व वैयक्तिक वादातून मोठा भाऊ झोपेत असताना डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खोदून पुरण्यात आला. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपासासाठी त्याला शिऊर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. रक्ताच्याच नात्याने केलेल्या या थंड डोक्याने आखलेल्या हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली असून, पुढील तपास शिऊर पोलीस करीत आहेत.
लहानु दिवेकर यांनी आपल्या भावाचा इतक्या थंड डोक्याने खून का केला, याबाबत परिसरात वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. प्रशासनाकडून सध्या हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचे सांगण्यात येत असले, तरी या हत्येमागे अनेक पडद्यामागच्या गोष्टी घडल्या असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नात्यांमधील वाद इतक्या टोकाला कसा पोहोचला? भावाचा निर्घृण खून का करावा लागला? याचा तपास पोलिस करत आहेत.