

केज : हातात पिस्तूल घेऊन फोटो काढायचे आणि ते सोशल मीडियावर 'स्टेटस' म्हणून ठेवून समाजात दहशत निर्माण करायची, ही 'भाईगिरी' केज तालुक्यातील काही तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून त्याचे जाहीर प्रदर्शन केल्याप्रकरणी केज पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही तरुण व्हॉट्सॲप स्टेटसवर पिस्तूल हातात घेतलेले फोटो व्हायरल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या फोटोंच्या माध्यमातून समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ कारवाईचा बडगा उगारला.
या प्रकरणी पोलीस हवालदार उमेश आघाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश अर्जुन मुंडे, रामदास जगन्नाथ मुंडे, पांडुरंग रामा मुंडे (सर्व रा. देवगाव, ता. केज), रामचंद्र परसराम ओमासे (रा. बेडा, ता. जत, जि. सांगली) या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, हवालदार उमेश आघाव आणि रशीद शेख यांच्या पथकाने गणेश मुंडे, रामदास मुंडे आणि पांडुरंग मुंडे या तिघांना अटक केली. पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचे 'सांगली कनेक्शन' समोर आले आहे. आरोपींनी हे फोटो सांगली जिल्ह्यातून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती दिली आहे. या गुन्ह्यातील चौथा आरोपी रामचंद्र ओमासे हा सांगली जिल्ह्यातील असून तो अद्याप फरार आहे. त्याच्या अटकेनंतरच हे शस्त्र जप्त केले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे करत आहेत. सोशल मीडियाचा वापर करून अशाप्रकारे दहशत पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.