

One person was murdered; the body has been identified beed
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात आढळलेल्या एका अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
१८ डिसेंबर २०२५ रोजी बर्दापूर पोलिस ठाणे हद्दीतील जवळगाव (ता. अंबाजोगाई) शिवारात मंचक पंढरी डवरेच्या गायरान शेतात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाठीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनेची नोंद घेऊन बर्दापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला.
शवविच्छेदन अहवालानुसार सदर व्यक्तीचा मृत्यू गळा आवळून केलेल्या खुनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बर्दापूर पोलीस ठाणे गुन्हा र.नं. २९९/२०२५, भा. न्या. सं. कलम १०३ (१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास वेगाने पुढे नेण्यात आला. सखोल तपासात मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मयताचे नाव स्वप्नील ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ (वय ३०, रा. चक्रे गल्ली, रेणापूर, जि. लातूर) असे असून, तो मुख्य आरोपी गोरोबा मधुकर डवरे यांचा साडूचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले.
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, गोरोबा डवरे याने स्वप्नील याचे संगोपन केले होते व त्याचे लग्नही लावून दिले होते. मात्र, लग्नानंतर स्वप्नील हा दारूच्या व्यसनाधीन होऊन पत्नी व गोरोबा यांना सतत त्रास देत होता. याच कारणावरून मनात राग धरून गोरोबा डवरे याने इतर आरोपींच्या मदतीने स्वप्नीलला रेणापूर येथून जवळगाव येथे आणून जबर मारहाण करून गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई नवनीत कावत, चेतना तिडके, शिवाजी बांटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, मारुती कांबळे, रामचंद्र केकण, विष्णू सानप, गोविंद भतने, तसेच सचिन आंधळे, विकी सुरवसे, चालक पो.ह. अतुल हराळे व स्थानिक गुन्हे शाखा बीड आणि बारडापूर पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.
आरोपी २० डिसेंबर रोजी ताब्यात
गोरोबा मधुकर डवरे (वय ४५, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई), संतोष लिंबाजी मांडळे (वय ३४, रा. इंडियनगर, लातूर), किशोर गोरोबा सोनवणे (वय २९, रा. माता जीनगर, लातूर), अमोल विनायक चव्हाण (वय २६, रा. दुर्गा तांडा, ता. कंधार, जि. नांदेड; सध्या रा. रेणापूर नाका, लातूर) या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलिस स्टेशन बर्दापूर हे करीत आहेत.