

Charges have been framed against the Valmik Karad gang.
बीड : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मंगळवारी विशेष मोका न्यायालयात वाल्मीक कराड व त्याच्या गँगवर आरोप निश्चित (चार्ज फ्रेम) केले आहेत. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयात पुराव्यांच्या प्रती, फॉरेन्सिक तपासासाठी दिलेला लॅपटॉप, अतिरिक्त पुरावे (अॅडिशनल एव्हिडन्स) तसेच आरोपींकडून वारंवार वकील बदलण्यावरून न्यायालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेले दोषारोपपत्र १८०० पानांचे आहे. या प्रकरणात आठ आरोपी असून एक फरार आहे. सात आरोपी न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने आरोपींना आरोप मान्य आहेत का, असे विचारल्यावर सर्व आरोपींनी आरोप अमान्य असल्याचे सांगितले. सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाशी संबंधित उच्च न्यायालयातील सर्व अर्ज निकाली निघालेले आहेत. त्यामुळे आता थेट आरोप निश्चितीकडे न्यायालयाने जावे.
आरोपींच्या वकिलांनी आरोप निश्चितीपूर्वी आक्षेप घेत म्हणणे मांडले की, फॉरेन्सिककडे दिलेल्या लॅपटॉपमधील डेटाची कॉपीही आम्हाला देण्यात आलेली नाही. यावर उत्तर देताना उज्ज्वल निकम यांनी, हा लॅपटॉप सध्या फॉरेन्सिककडे आहे. तपास पूर्ण होताच संबंधित पुरावे देण्यात येतील, असे नमूद केले. तपास अधिकाऱ्यांनीही यामध्ये खासगी स्वरूपाचा मोठ्या प्रमाणावर डेटा असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण डेटा देणे शक्य नाही, असे स्पष्ट केले.
न्यायालयाची स्पष्ट भूमिका न्यायालयाने स्पष्ट निर्देश देत म्हटले की, तपास यंत्रणेकडे पुरावे आल्यानंतर तत्काळ आरोपींच्या वकिलांना ते द्यावेत. सरकारी पक्षानेही, पुरावा मिळताच तो त्वरित दिला जाईल, अशी हमी दिली.
वाल्मीक कराडला सुनावले न्या. व्यंकटेश पाटवदकर यांनी थेट प्रश्न केला की, सगळ्या आरोपींना विचारणा केली जात आहे, कोणाला वकील बदलायचे आहेत का? त्यावर आरोपी वाल्मीक कराड याने उत्तर देत सांगितले की, सगळ्या आरोपींचे वेगवेगळे वकील असतील. यानंतर सर्व आरोपींनी वकील बदलण्याची इच्छा व्यक्त केली.
यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना त्यांच्यावर असलेले आरोप वाचून दाखवत म्हटले की, सर्व आरोप तुम्हाला मान्य आहेत का? यावर उत्तर देताना आरोपी वाल्मीक कराड याने आरोप मान्य नाहीत, पण मला बोलायचं आहे, असे सांगितल्यावर न्यायालयाने, आता फक्त हो किंवा नाही एवढंच सांगा, असे बजावले.