

केज; पुढारी वृत्तसेवा : केज शहरातील धारूर रोडजवळील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्याचा घरातील पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाला. ही घटना घडून तीन-चार दिवस झाले असून सोमवारी (दि.२०) सायकांळीच्या सुमारास उघडकीस आली. गजानन कुकडे असे या आचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, केज शहरातील नाईकवाडे गल्लीत गजानन कुकडे हे भाड्याने राहत होते. ते धारूर रोडवरील एका हॉटेलवर आचाऱ्याचे काम करीत होते. मागील महिन्यात त्यांची पत्नी आजारी असल्याने औषधोपचारासाठी बाहेरगावी गेली होती. त्यामुळे गजानन कुकडे हे एकटेच घरी होते. सोमवारी सायकांळी सहा वाजता त्यांची पत्नी आणि सासू गावाहून परत आल्या. यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आवाज देऊनही आतून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. शेजारील एकाने घराच्या भिंतीशेजारी असलेल्या झाडावरून आत डोकावून पाहिले असता त्याला गजानन कुकडे यांचा मृतदेह पाण्याच्या हौदात आढळून आला. त्यानंतर केज येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गजानन कुकडे यांचा मृतदेह हौदातून बाहेर काढला. दरम्यान तीन ते चार दिवसांपुर्वी कुकडे यांचा मृत्यू झाला असल्याने घरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.