Beed Crime News : माहेरी जाण्याच्या आदल्याच दिवशी घेतला गळफास

धोंड्याच्या महिन्यातच नवविवाहितेचा दुर्दैवी शेवट; पाच जणांवर गुन्हा
Beed Crime News
माहेरी जाण्याच्या आदल्याच दिवशी घेतला गळफासpudhari photo
Published on
Updated on

गेवराई : गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नाला अवघे एक वर्ष पूर्ण होत असताना २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली.

या प्रकरणी मृत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत तक्रार दिल्यानंतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच संबंधित कुटुंबीय फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Beed Crime News
Sindhudurg Drowning Tragedy : आजीच्या 'उत्तरकार्या'साठी मुंबईहून आलेल्या नातीसह तीन मुलींचा धरणात बुडून दुर्दैवी अंत

पूजा प्रमोद सुरवसे (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती गेवराई शहरातील गजानन नगर येथे पती व सासरच्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होती. मंगळवारी (दि. २ जून) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास तिने घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघड झाले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच परभणी जिल्ह्यातील तिच्या माहेरची मंडळी मोठ्या संख्येने गेवराई येथे दाखल झाली. त्यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून त्यामागे सासरच्या मंडळींचा छळ व अन्य कारणे असू शकतात, असा आरोप केला. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि शवविच्छेदनासही संमती देणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली.

यामुळे उपजिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा सासरच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Beed Crime News
Sangli Drowning Incident : मुलांना पोहण्यास शिकवताना वडिलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित कुटुंबीय घर सोडून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयात इन-कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह माहेरच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णवाहिकेतून मृतदेह परभणी येथे नेण्यात आला असून तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण काळात उपजिल्हा रुग्णालयात माहेरच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पूजा हिचा विवाह गेल्याच वर्षी गेवराई येथील प्रमोद सुरवसे यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला होता. संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन नवजीवनाची सुरुवात केलेल्या या तरुणीचा अवघ्या एका वर्षात झालेला दुर्दैवी अंत सर्वांनाच चटका लावणारा ठरला आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी या दाम्पत्याचा लग्नानंतरचा पहिला 'धोंड्याचा महिना' असल्याने दोघेही परभणी येथे माहेरी जेवणासाठी जाणार होते. त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्याने दोन्ही कुटुंबांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news