Sangli Drowning Incident : मुलांना पोहण्यास शिकवताना वडिलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धुळगाव येथील घटना; तीन मुलांसमोरच घटना
Sangli Drowning Incident : मुलांना पोहण्यास शिकवताना वडिलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
Published on
Updated on

तासगाव : धुळगाव (ता. तासगाव) येथे मुलांना पोहण्यास शिकवायला गेलेल्या वडिलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. तीन मुलांसमोरच वडिलांचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार, दि. 16 मे रोजी दुपारी घडली. वैभवसिंह विजयसिंह डुबल (वय 32, रा. धुळगाव) असे मृताचे नाव आहे. घटनेची तासगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

वैभवसिंह हे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुले स्वरांजली (वय 12), नेत्रांजली (10) व मुलगा समरजित (8) यांना घेऊन घरामागे असणाऱ्या धबधबी मळा येथील शेततळ्यावर पोहण्यास शिकवण्यासाठी गेले होते. काही वेळ मुलांना पोहणे शिकवल्यानंतर वैभवसिंह तळ्याबाहेर आले. त्यांनी मुलांचे ओले कपडे बदलले. कपडे बदलत असताना पायाला माती लागल्याने, पाय धुण्यासाठी त्यांनी पुन्हा पाण्यात खोच मारली. मात्र, शेततळ्याच्या तळाशी असलेल्या गाळात तोंड अडकल्याने त्यांचा पाण्यातच बुडून मृत्यू झाला.

वडील पाण्यातून बाहेर येत नसल्याचे पाहून काठावरील मुलांनी आरडाओरड सुरू केली आणि घरी धाव घेऊन आजीला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व गल्लीतील मुस्तफा देवर्षी, चेतन पाटील, अक्षय पाटील, नागेश नाईक आणि वैभवसिंह यांचे भाऊ हर्षवर्धन यांनी येऊन स्थानिक मजुरांच्या मदतीने पाण्यात उतरून वैभवसिंह यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. गाळात डोके अडकल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री धुळगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news