

Neelam Gorhe criticism on Rupali Chakankar
बीड, पुढारी वृत्तसेवा : एखादा व्यक्ती पूर्वी एखादी बाजू मांडू शकतो किंवा त्या बाजूने मत व्यक्त करू शकतो, परंतु तो जेव्हा एखाद्या जबाबदारी असलेल्या खुर्चीवर बसतो, तेव्हा त्याला आपण कुठल्या खुर्चीवर बसलोय हे समजले पाहिजे, असे मत विधान 'परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी व्यक्त केले. डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर गो-हे यांनी हे मत व्यक्त केले.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे या बुधवारी (दि. २६) सायंकाळी बीड दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. गो-हे म्हणाल्या, संपदा मुंडे व गौरी गर्जे या दोन सुशिक्षित तरुणींनी आत्महत्या केली. फलटणमध्ये ही घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षकांना अनेक निर्देश दिले होते.
अप्रस्तुत माहिती माध्यमातून दिली जात होती ते थांबवण्यास सांगितले, तर नुकत्याच घडलेल्या गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात मी कुटुंबीयांची भेट घेणार आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे हाही गुन्हा आहे. विधिमंडळाने एक समिती नियुक्त केली आहे की, उच्च पदस्थ लोकांकडे काम करणारांनासुद्धा एक आचारसंहिता असली पाहिजे. महाराष्ट्रात बालिकांवरील अत्याचाराच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत, अशा घटनांमध्ये आरोपींना अटक करण्याबाबत दबाव येत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात पोलिस अधीक्षक व पोलिस महानिरीक्षकांना भेटणार आहे. डॉ. गौरी गर्जे प्रकरणात पोलिसांनी विलंब केला असे वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधताना तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला निशाणा केले जात असल्याच्या वक्तव्यावर नीलम गो-हे म्हणाल्या की, राजकारणात अनेक शत्रू असतात. कोण कोणाचा कसा फायदा घेऊन आरोप करेल हे सांगता येत नाही, परंतु न्याय देताना कोणाचा पीए आहे म्हणून कमी अथवा जास्त शिक्षा दिली जात नाही, असेही गो-हे म्हणाल्या. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक उपस्थित होते.