

NCP rally in Beed MLA Dhananjay Munde's question to the opposition
बीड, पुढारी वृत्तसेवा : गेले दोनशे दिवस मी न बोलता काढले आहेत. या काळात काय काय झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. पण वैर माझ्याशी होते तर माझ्यावर बोलायचे, बीड जिल्ह्याची बदनामी का केली? असा सवाल माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला.
रविवारी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार नवपर्वाचा या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी शेरो शायरी करत विरोधकांना सवाल केला. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. विक्रम काळे, माजी आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी आ. धनंजय मुंडे म्हणाले की, आज मी भाषण करणार नव्हतो, पण तरीही तुमच्याशी संवाद साधतो आहे. गेले दोनशे दिवस मी न बोलता काढले आहेत. या काळात कोणी कोणी काय काय आरोप केले हे तुम्ही पाहिले असे ते म्हणाले.
बरे झाले अंधार मला दिला... एक ठिणगी लागली आत उजळायला अशा ओळींचा वापर करत धनंजय मुंडे यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली तसेच भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात 'तुम्हारे सोच के साचे मे, मै ढल नही सकता... जुबान काट लो... लहेजा बदल नहीं सकता... अरे मुझे मोम का पुतला समज रहे को क्या? तुम्हारी लौ से ये लोहा पिघल नही सकता...' असे म्हणत आपल्या आगामी वाटचालीचे संकेतच धनंजय मुंडे यांनी दिले.