

केज : केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शाळेची जागा इतर कोणत्याही संस्थेला किंवा खासगी कामासाठी हस्तांतरित करू दिली जाणार नाही, तसेच ही शाळा पुन्हा पूर्वीसारखीच गजबजणार, अशी ठाम ग्वाही आमदार नमिता मुंदडा यांनी दिली.
जिल्हा परिषद शाळेची जागा केवळ शैक्षणिक कारणांसाठीच वापरण्यात यावी, अशी आग्रही मागणी आ. मुंदडा यांनी विधिमंडळात लावून धरली होती. या प्रयत्नांमुळे शाळेच्या जागेचे संरक्षण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या प्रांगणात आ. मुंदडा यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, नेताजी शिंदे, भगवान केदार, डॉ. वसुदेव नेहरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना आ. नमिता मुंदडा भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, शाळा ही केवळ इमारत नसून संस्कारांचे मंदिर आहे. केजच्या या ऐतिहासिक शाळेचा वारसा जपणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. मी शब्द देते की, ही जागा कोणाच्याही खासगी फायद्यासाठी वापरू दिली जाणार नाही. शाळेला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन.तसेच शाळेच्या जागेचा वापर केवळ शैक्षणिक उद्देशांसाठीच होईल, यासाठी आवश्यक ती कायदेशीर खबरदारी घेतली जाईल. केज शहरातील शासकीय भूखंडांवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवण्यासाठीही प्रशासकीय स्तरावर कठोर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमास गिरीशभाऊ देशपांडे, सुनील केंद्रे, संजय चौरे सर, हनुमंतराव भोसले सर, प्रवीण देशपांडे, प्रकाश मुंडे, पिंटू पाटील, सचिन देशपांडे, समयोदीन इनामदार, विनायक नेहरकर, सुंदर तपसे, सचिन नेहरकर, राहेकवाल सर, बारामतीचे संतोष शिंदे, बारामती रोटरीचे अध्यक्ष रविकिरण यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत भोसले सर यांनी प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार गिरीश देशपांडे यांनी मानले.