

MP Sonawane will review 'Swarati'
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई (स्वाराती) येथे उपलब्ध रुग्णसेवा, आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, औषध साठा, पायाभूत सुविधा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे हे सविस्तर आढावा घेणार आहेत. यासाठी सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
खा. बजरंग सोनवणे यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात येत असून, यासंदर्भात रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास पत्राद्वारे आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस सर्व संबंधित विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशासनातील जबाबदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना दर्जेदार, वेळ-`वर व सुलभ आरोग्यसेवा मिळावी, रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात तसेच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यात यावा, या उद्देशाने ही आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे पत्रात
नमूद करण्यात आले आहे. बैठकीत रुग्णसेवेशी संबंधित विविध मुद्यांवर सखोल चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. खा. बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण व दळण-वळण या मूलभूत विषयांना नेहमीच प्राधान्य दिले आहे.
जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना ते वेळोवेळी अचानक भेटी देत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क राहते. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना उत्तम उपचार व सुविधा मिळाव्यात, हा त्यांचा मुख्य उद्देश असून, त्या दृष्टीनेच 'स्वाराती'तील या आढावा बैठकीकडे विशेष महत्त्व दिले जात आहे.