

Borade's arrest protested in Gevrai
गेवराई, पुढारी वृत्तसेवाः धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनापूर्वीच धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गेवराई येथे शनिवारी उग्र आंदोलन करण्यात आले.
शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास गेवराई-बीड बायपासवरील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, झमझम पेट्रोल पंपाजवळ धनगर समाजातील तरुणांनी दोन टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घो षणाबाजी करण्यात आली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
आंदोलनाची माहिती मिळताच गेवराई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जळते टायर बाजूला काढत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली. मात्र, नेत्याला ताब्यात घेतल्याच्या कारवाईमुळे समाजातील संताप अधिकच तीव्र झाल्याचे चित्र दिसून आले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
शांततेच्या मागनि आंदोलन करण्याचा प्रयत्न असताना नेत्यालाच अडविण्यात आल्याने लोकशाही मार्ग दडपल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटल्याने जिल्ह्यासह राज्यात पुढील आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू आहे.