

Modi visits traders' hunger strike
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात गेली चार दिवसांपासून सुरू असलेले व्यापाऱ्यांच्या परवानाधारक उपोषणाला माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी भेट दिली. भेटीत उपोषण कर्त्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून ते करत असलेल्या उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर परवानाधारक व्यापाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असेही आश्वासन राजकिशोर मोदी यांनी उपोषणाला बसलेल्या व्यापाऱ्यांना दिले. यावेळी मोदी यांच्यासोबत जेष्ठ व्यापारी प्रकाश सोळंकी, अंबाजोगाई नगर परिषदेचे गटनेते सय्यद ताहेर हे उपस्थित होते.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीने वितरित केलेल्या भूखंडाचे भाडे भरून घेऊन देखील वारंवार मागणी करून देखील सदर भूखंडावर त्या परवानाधारक व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या वतीने व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने परवानाधारक व्यापाऱ्यांनी गेली चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाईने 2002 मध्ये ठराव क्रमांक 12 अन्वये व्यापाऱ्यांना वाटप केलेल्या भूखंडांवर नोंदणीकृत भाडेपट्ट्यांच्या आधारे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, तसेच भूखंडांवर बांधकाम करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी लायसन्स व परवानाधारक व्यापाऱ्यांनी केली आहे.
वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने दि. 12 नोव्हेंबर पासून येथील व्यापाऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून व्यापाऱ्यांच्या उपोषणात अनेक व्यापारी, संघटना सहभाग घेत आहेत. दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी आज माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी भेट देत व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आमरण उपोषण सुरु असताना व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे दोन्ही संचालक गेले कुठे ? असा संतप्त सवाल उपोषणास बसलेल्या व्यापाऱ्यांनी केला आहे. या आमरण उपोषणात 7 जण व्यापारी सहभागी असून 30 ते 40 जण साखळी उपोषण करीत आहेत.
बाजार समिती, ही काही व्यापाऱ्यांबाबत वेगळी आणि आमच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत असल्याचे व्यापाऱ्यांनी राजकिशोर मोदी यांना सांगितले. दरम्यान व्यापाऱ्यांच्या या मागण्यांविषयी आपण पाठपुरावा करून लवकरच व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.