

Beed Pilgrimage to Sushi on the occasion of Badal Shah's Urus
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत किबला सय्यदशहा बदलमशहा (रहेमतुल्लाह अलईह) दर्गाह, सुशी येथे उरुसानिमित्त बुधवार, दि. 11 नोव्हेंबर रोजी गावातून संदल छबीना मिरवणूक तर गुरुवार, दि. 12 व शुक्रवार दि. 13 रोजी दोन दिवसीय यात्रा उत्साहात झाली. तर यात्रेकरूंनी यात्रेसाठी मोठी गर्दी केली होती. यात्रा आणि उरुस हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात. या उत्सवांमध्ये दोन्ही धर्माचे नागरिक कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र येतात आणि धार्मिक सलोख्याचा संदेश देतात.
सणात सण हा आगळा-वेगळा उत्सव म्हणजे उरुस व यात्रोत्सव होय. दिवाळीची अमावास्या होऊन जो बुधवार येतो, त्या दिवशी गेवराई तालुक्यातील सुशी येथे संदल मिरवणूक होऊन यात्रेला प्रारंभ झाला. बुधवार, दि. 11 नोव्हेंबर रोजी हजरत किबला सय्यदशहा बदलमशहा यांच्या उरुस निमित्त गावातुन हिंदू-मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संदल मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणूकीत सर्व गांवकरी तसेच मुंबई, पुणे, संभाजीनगर, वडगांव, चिखली, सिंदखेड, कवडगांव, बंगालीपिंपळा, कोळगाव, मादळमोहीसह अन्य ठिकाणाहूनही लोक मोठ्या संख्येने सहभागी होते.
तर गुरुवार हा यात्रेचा दुसरा दिवस, म्हणजे बच्चे कंपनीचा मौजमजा करण्याचा दिवस असतो. या ठिकाणी गेवराई, मादळमोही, सिरसदेवी, गढी, उमापूर, सिरसमार्ग येथील कापड दुकानदार, हॉटेलचालक व खेळण्याचे व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने थाटली होती. उरुसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणूक व यात्रोत्सवात यात्रेकरूसह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यात्रेच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.