

MLA Vijaysinh Pandit: Will not tolerate irregularities in development works
बीड, पुढारी वृत्तसेवा स्व. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मिळालेल्या निधीतून अतिशय दर्जेदार कामे केली जातील. दर्जेदार विकास कामे हीच स्व. अजितदादांना श्रध्दांजली ठरणार आहे त्यामुळे विकास कामांचा दर्जा राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, यामध्ये गैरप्रकार सहन करणार नाही अशी रोखठोक भूमिका आ. विजयसिंह पंडित यांनी मांडली. शहरातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आ. पंडित व नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रविवारी झाला यावेळी ते बोलत होते.
रविवार, दि. २८ जून रोजी बीड शहरातील राजुरीवेस-कबाड गल्ली-माळीवेस या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. विजयसिंह पंडित आणि नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, सभापती शेख निजाम, सादेक जमा, जैतुल्ला खान, अॅड. महेश धांडे, शेख बिलाल, मनोज गोडसे, वाजेदभाई कुरेशी, माजी नगरसेवक शेख इकबाल, भागवत तावरे, प्रा. अजिंक्य पांडव यांच्यासह या भागातील नागरीक मोठ्क्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक करत असताना माजी नगरसेवक शेख इकबाल म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून अजित पवार यांन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या भागाच्या विकासाला गती मिळाली आहे. यावेळी बोलत असताना या भागाचे नगरसेवक अॅड. महेश धांडे म्हणाले की, शहराच्या विकासाला आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून गती मिळत आहे. विकास कामात कसल्याही प्रकारचे राजकारण न करता सकारात्मक पध्दतीने शहराचा विकास झाला पाहिजे अशी भुमिका शिवछत्र परिवाराने घेतली आहे.
यानंतर प्रभाग क्र. १७ व परिसरातील नागरीकांच्यावतीने आ. विजयसिंह पंडित आणि नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता पारवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागणार
बीड शहराचा बारामती सारखा विकास करण्याचे स्व. अजितदादांचे स्वप्न होते. बीड शहराची रखडलेली विकास कामे पूर्ण करणे हीच खरी अजितदादांना श्रध्दांजली ठरणार आहे. बीड शहराच्या विकासासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. सुनेत्रावहिणी पवार यांच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, रखडलेल्या भुयारी आणि अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न देखील मार्गी लावला जाईल अशी ग्वाही आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी दिली.