

MLA Namita Mundada selected for the 69th Commonwealth Parliamentary Conference in South Africa
अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात १३ ते १९ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित ६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संधी विधानसभेच्या सदस्या आमदार नमिता मुंदडा यांना मिळाली आहे. त्यांच्या अत्यंत प्रभावी आणि धडाडीच्या कार्यक्षमतेची दखल घेत संसदीय पातळीवर त्यांना हा बहुमान देण्यात आला असून, या जागतिक व्यासपीठावर त्या राज्यातील जनतेचा आणि विशेषतः महिला व युवा वर्गाचा आवाज बुलंद करणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणाऱ्या भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळात लोकसभा, राज्यसभा आणि सर्व राज्य विधानमंडळांचे पीठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नमिता मुंदडा यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. दरवर्षी होणाऱ्या या राष्ट्रकुल आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांमध्ये वैचारिक आदानप्रदान करणे आणि परस्पर सहकार्यातून संसदीय व्यवस्था अधिक दृढ करणे यावर भर दिला जातो.
बदलत्या जागतिक व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय कायदा आणि संसदीय लोकशाहीचे सक्षमीकरण ही या वर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये न्याय्य व सर्वसमावेशी व्यापारपद्धतीची निर्मिती, हवामान बदलाची आव्हाने, मानवी हक्कांचे संरक्षण आणि शांततेला प्रोत्साहन यांसारख्या अत्यंत कळीच्या विषयांवर या परिषदेत विचारमंथन होईल.
तसेच संसदेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर, कायदा मंजुरीनंतरची छाननी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी संसदीय व्यवस्था अधिक सुलभ करणे यावरही जागतिक नेते चर्चा करणार आहेत. नमिता मुंदडा यांच्यासारख्या अभ्यासू आणि तळागाळातील प्रश्नांची जाण असलेल्या लोकप्रतिनिधीचा या चर्चेतील सहभाग राज्यासाठी अत्यंत भूषणावह मानला जात आहे.
या मुख्य परिषदेसोबतच दहावी कॉमनवेल्थ वुमन पार्लमेंटॅरिअन कॉन्फरन्स आणि युथ राऊंडटेबल कॉन्फरन्सचेही आयोजन केपटाऊन येथे करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण आणि युवा नेतृत्वाच्या अनुषंगाने आमदार नमिता मुंदडा यांची या परिषदेतील उपस्थिती आणि मांडणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा हा मोठा गौरव असल्याची भावना राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.