

मुंबई : बीड जिल्ह्यात बालविवाहामुळे 14 गर्भवती मातांची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी 7 माता प्रसूत झाल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. मुख्य म्हणजे, याप्रकरणी लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यासंदर्भात गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अशा स्त्रीची गरोदर माता म्हणून नोंद घेतली जाते, अशी माहिती यावेळी पुढे आली.
संगमनेरचे आमदार अमोल खताळ, अंधेरी पूर्वचे आमदार अमित साटम यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला होता. त्याला आरोग्यमंत्री आबिटकर यांनी लेखी उत्तर दिले. या उत्तरात म्हटले आहे की, एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत बीड जिल्ह्यात बालविवाहामुळे 14 गर्भवती मातांची नोंद पोर्टलवर करण्यात आली असून, त्यापैकी 7 माता प्रसूत झाल्या आहेत. केंद्र सरकारने हे आर.सी.एच. पोर्टल तयार केले असून, त्यामध्ये जननक्षम जोडपी, गरोदर माता व बालक यांची नोंदणी व दिलेल्या सेवांचे अद्ययावतीकरण केले जाते. त्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्यांच्या नोंदी करता येत नाहीत.
दरम्यान, राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांना कळविण्यात आल्याचेही लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.