

Misappropriation of funds in Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme works
केज, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मग्रारोहयो) कामांमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी भगवान यादव शिरसट आणि ग्रामरोजगार सेवक सादेक दिलावर शेख यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी अपहाराची ५८ लाख ५१ हजार ५८१ रुपयांची रक्कम परत न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
नांदूरघाट ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या कामांची केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, अंबाजोगाई जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता आर. बी. काळे, शाखा अभियंते आर. आर. कदम, ए. एम. गाडे आणि एम. एल. सय्यद यांच्या समितीने चौकशी केली होती.
या चौकशीत तब्बल १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. चौकशी अहवालानुसार सरपंच सुनिता युवराज जाधव यांच्याकडे ३३ लाख १५ हजार १४७ रुपये, ग्रामपंचायत अधिकारी भगवान यादव शिरसट यांच्याकडे २५ लाख ३६ हजार ४३४ रुपये, ग्रामरोजगार सेवक सादेक दिलावर शेख यांच्याकडे ३३ लाख १५ हजार १४७ रुपये, तत्कालीन शाखा अभियंता व्ही. एम. सासवडे यांच्याकडे ४ लाख १५ हजार १५३ रुपये आणि पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी आर. आर. दराडे यांच्याकडे ८ लाख ७ हजार ५९९ रुपयांच्या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांकडून अपहाराची रक्कम परत भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरपंच सुनिता जाधव, शाखा अभियंता व्ही. एम. सासवडे आणि तांत्रिक अधिकारी आर. आर. दराडे यांनी संबंधित रक्कम ग्रामपंचायतीच्या मग्रारोहयो खात्यात जमा केली.
मात्र, ग्रामपंचायत अधिकारी भगवान शिरसट आणि ग्रामरोजगार सेवक सादेक शेख यांनी अनुक्रमे २५ लाख ३६ हजार ४३४ आणि ३३ लाख १५ हजार १४७ रुपये जमा केले नाहीत. त्यामुळे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी विस्तार अधिकारी विजयकुमार रामभाऊ मस्के यांना प्राधिकृत करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी विजयकुमार मस्के यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम पुढील तपास करीत आहेत.
सरपंच सुनिता जाधव यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव !
दरम्यान, नांदुरघाटसारख्या गावामध्ये तब्बल एक कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची बाब चौकशीत समोर आली होती. यानंतर संबंधीतांना अपहाराची रक्कम भरण्यास मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत सरपंच सुनिता युवराज जाधव यांच्याकडे ३३ लाख १५ हजार १४७ रुपये, तत्कालीन शाखा अभियंता व्ही. एम. सासवडे यांच्याकडे ४ लाख १५ हजार १५३ रुपये आणि पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी आर. आर. दराडे यांच्याकडे ८ लाख ७ हजार ५९९ रुपयांची जबाबदारी होती, त्यांनी ती रक्कम भरली देखील.
परंतु सिरसाट व शेख यांनी रक्कम न भरल्याने गुन्हा दाखल झाला. तर दुसरीकडे अपहार करणाऱ्या दराडे यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. तर सासवडे यांच्यावर देखील कारवाई होणार असून सरपंच सुनिता जाधव यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे.