हत्येच्या दिवशी वाल्मीक कराडची देशमुखांना धमकी, नंतर अपहरण अन्‌ निर्घृण हत्या- SIT

Santosh Deshmukh Murder case Walmik Karad SIT कडून न्यायालयात पुरावे सादर
Santosh Deshmukh Murder case, Walmik Karad
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड याला आज बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी (Santosh Deshmukh Murder case) प्रकरणात वाल्मीक कराड (Walmik Karad) याला मंगळवारी 'मोका' लावण्यात आला. त्यानंतर बुधवारी त्याला पुन्हा बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या घटनेबाबत एसआयटीने न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली. ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यांची हत्या केली. कराडचे सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यात संभाषण झाले होते, असा दावा एसआयटीकडून (SIT) न्यायालयात करण्यात आला. दरम्यान, कराडवर मोका का लावला? यासाठी त्याच्यावरील गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आली.

वाल्मीक कराड यांचे संभाषण आणि संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ मिळतीजुळती आहे, असे सांगत एसआयटीकडून वाल्मीक कराडची १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. तपासदरम्यान मिळालेल्या पुराव्यांची शहानिशा करायची आहे. तसेच विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. तसेच संशयित आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी कराड याची कोठडी हवी असल्याचा दावा एसआयटीने केला. वाल्मीक कराडची देश-विदेशात मालमत्ता आहे का? याचा शोध घ्यायचा असल्याचे एसआयटीकडून सांगण्यात आले.

आरोपींनी कोणी मदत केली?

कृष्णा आंधळे फरार असून त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का? याचा तपास करायचा आहे. घुले, चाटे फरार असताना त्यांना कोणी मदत केली? याचाही तपास करायचा असल्याचा युक्तिवाद एसआयटीच्या बाजूने करण्यात आला.

वाल्मीक कराडची अटक बेकायदेशीर- कराडच्या वकिलाचा दावा

तर वाल्मीक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी, कोणत्याही आरोपीने कराडचे नाव घेतले नसल्याचा दावा केला. वाल्मीक कराडाची अटक बेकायदेशीर आहे. कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही, असाही त्यांनी युक्तिवाद केला.

फोन कॉल केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का?

एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का? खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केले? या एकाच प्रश्नावर दोन्ही बाजूने २५ मिनिट युक्तिवाद झाला.

आज दिवसभरात काय घडलं?

खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी वाल्मीक कराडला १४ जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींच्या वकिलाने जामीन अर्ज सादर केल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाईचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. आज सकाळी ११.३० वाजता वाल्मीक कराडला केज पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर बीड येथील मोका न्यायालयात हजर करण्यासाठी दुपारी १२:३५ वाजता त्याला केजमधून मोठ्या पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले.

रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक बंद

वाल्मीक कराड याला केज पोलीस ठाण्यातून बीडच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली दोन्ही वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.

Santosh Deshmukh Murder case, Walmik Karad
वाल्मीक कराड समर्थक दुसर्‍या दिवशीही आक्रमक; पांगरी येथे टॉवरवर चढून आंदोलन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news