

Beed News: Tourist bus overturns near Marathwadi on the Ahilyanagar-Pathardi route
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून नांदेड कडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स मार्गावर अहिल्यानगर-पाथर्डी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली. हा अपघात आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथील हॉटेल सम्राटसमोर पहाटे ३:२५ वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व २० प्रवासी जखमी झाले आहेत.
स्वामी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स'ची बस (क्रमांक ए.आर. ०६ बी.६७००) पुण्यावरून अहिल्यानगर-पाथर्डी मार्गे नांदेडच्या दिशेने २० प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटेच्या सुमारास बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असताना आष्टी तालुक्यातील मराठवाडी शिवारात ट्रॅव्हल्समध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्यावर उलटली. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली.
मात्र नशीब बलवत्तर असल्याने सर्व प्रवासी मोठ्या अनर्थातून बचावले. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे ३:२५ च्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने हालचाली केल्या.