

Marijuana worth Rs 10 lakh seized in Parli
परळी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील इराणी गल्लीत राहत्या घरात साठवून ठेवलेला पन्नास किलो गांजा संभाजीनगर पोलिसांनी मंगळवारी पकडला. या ठिकाणाहून पॅकेजिंगचे साहित्य देखील जप्त करण्यात आले असून या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील इराणी गल्लीतील वसीम ऊर्फ शराबी अक्रम बेग आणि अक्रम रफीक बेग या दोघांच्या राहत्या घरावर मंगळवारी संभाजीनगर पोलिसांनी छापा मारला. यावेळी हे दोघेही पळून गेले. मात्र त्या ठिकाणाहून ५३ किलो गांजा, गांजा विक्रीसाठी वापरले जाणारे ३१ मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, पॅकिंग मेटेरियल, लेडीज पर्स, ड्रम, टब, रिक्षा, आदी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात शराबी अक्रम बेग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक ऋषीकेश शिंदे, पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, रघुनाथ नाचण, पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे, रियाज शेख, पवार, थळकरी, सौंदरकर, पठाण, गुट्टे, गायकवाड, गिते, पाचपांडे, तांदळे, चव्हाण, घोडके, डोंबरे आदींनी केली.
इराणी गल्लीत छापा मारल्यानंतर त्या ठिकाणाहून गांजासह तब्बल ३१ मोबाईल फोन व वजनकाटा देखील जप्त करण्यात आला आहे. यावरुन याच घरातून परळी शहरासह इतर ठिकाणी गांजा सप्लाय केला जात होता हे समोर आले असून यातील आरोपींच्या अटकेनंतर हे रॅकेट देखील समोर येऊ शकणार आहे.