

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde :
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) वापरून कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या नेत्यांवर आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर थेट हल्ला चढवला आहे. त्यांनी 'हैदराबाद गॅझेट' गुलामीचे आहे, असे म्हणणाऱ्या नेत्यांना अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
जरांगे-पाटील यांनी आक्षेप घेणाऱ्या नेत्यांना प्रतिप्रश्न केला की, "हैदराबाद गॅझेट गुलामीचं आहे, असं तुम्ही म्हणता. मग तुमचं आरक्षण कोणतं आहे? तुम्ही इंग्रजांच्या जनगणनेद्वारेच (Census) आरक्षण घेतलं ना?" त्यांनी स्पष्ट केले की, कायदा आणि संविधान कोणाच्या सांगण्यावरून चालत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील चांगल्या गोष्टी घ्यायच्या नाहीत का? असा सवाल करत, त्यांनी निजाम आणि मुघलांना पळवून लावणारे मराठे आपला चांगला इतिहास का घेऊ शकत नाहीत, असे विचारले.
जरांगे-पाटील यांनी टीका केली की, मराठ्यांनी ज्या नेत्यांना तीस-तीस वर्षे राजकीय करिअरमध्ये देश आणि राज्याच्या पातळीवर नेले, ज्यांना पूर्वी 'कुणी विचारत नव्हते', तेच नेते आता मराठ्यांच्या मुलांना हीनवून बोलू लागले आहेत. "यांचा बुरखा आता फाटला आहे, मराठ्यांना कळून चुकले आहे," असे ते म्हणाले. काही नेत्यांना जाती-जातीत तेढ निर्माण करण्याची नासकी सवय लागली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
यापुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "आता जे मराठ्याच्या विरोधात जाईल, तो नेता राजकारणातून संपवायचा, हे पक्क केलं आहे." त्यांनी स्पष्ट केले की, आपले लक्ष्य ओबीसी समाज किंवा एखादी जात नाही, तर ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचे आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मागे जो कोणी नेता जाईल, त्याच्या निवडणुकीतील सिटा पाडण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, एखाद्या मतदारसंघात ८-१० हजार मतदान असलेल्या जातींच्या मागे धावण्याची गरज नाही.
जरांगे-पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. महाजन आणि मुंडे हे घराणं पूर्वी नावाजलेलं होतं. पण या 'अकडू बुद्धीच्या' लोकांनी पैसा, गुंडगिरी, माज आणि धुंदी डोक्यात चढवून लोकनेते पदवी मिळवलेल्या साहेबांचे (गोपीनाथ मुंडे) नावही खराब करण्याचे काम केले. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचे (महादेव मुंडे आणि संतोष देशमुख) गंभीर आरोप करत, त्यांचे हात रक्ताने भरले असल्याचा दावा केला.
"हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले, आज तेच आरक्षणाला विरोध करतात," असे म्हणत जरांगे यांनी धनंजय मुंडेंना "माझ्या नादाला लागू नका, मराठ्यांकडे बघितले तर राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन," असा थेट इशारा दिला. यासोबतच त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.