

Manoj Jarange Patil Dasra Melava Speech :
बीडमध्ये आज दोन राजकीय मेळावे होत आहेत. भगवान गडावर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचं भाषण केलं. त्यानंतर आता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे नारायणगडावरून संबोधित केलं. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असतानाही ते नारायणगडावरील दसरा मेळाव्याला आले. ते रूग्णवाहिकेतून सभास्थळी दाखल झाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या दसरा मेळाव्यात थोड्या खलाच्या आवाजातच सुरूवात केली. त्यांच्या प्रकृती ठीक नसल्यानं ते दमल्यासारखे दिसले. मात्र जसजसं भाषण पुढं सरकत होतं तसतसं त्यांचा आवाच बुलंद होऊ लागला.
त्यांनी भाषणात आपण मराठ्यांची ७५ वर्षापूर्वीपासूनची मागणी मान्य करून दाखवली. जीआर झालाय आता चिंता नाही. माझं काम झालं आहे असा त्यांच्या भाषणाचा सूर होता. त्यानंतर त्यांनी हैदराबाद गॅझेटच्या जीआरबाबत टीका करणाऱ्यांचा देखील समाचार घेतला. त्यांनी नाव न घेता गुलामीचा जीआर म्हणणाऱ्यांवर टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील नुकसानीबाबात देखील सरकारला इशारा दिला. त्यांनी सरसकट हेक्टरी ७० हजार रूपये मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारातून, नेत्यांकडून, अभिनेत्यांकडून पैसे कापून घ्यावेत अशी देखील मागणी केली आहे.
त्यांनी शेतकऱ्यांसाठी आठ मागण्या समोर ठेवल्या आहेत. त्या मागण्या दिवाळीपूर्वी मान्य झाल्या नाही तर जिल्हा परिषदेला एकही सरकारचा उमेदवार निवडणून आणू नका असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच जर दिवाळीपूर्वी मागण्या मान्य झाल्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही. तारीख जाहीर केली तर नेत्यांना एक सभा घेऊ द्यायची नाही असंही जरांगे पाटील म्हणाले.