

Manjara dam gates opened
गौतम बचुटे
केज : बीड जिल्ह्यातील धनेगाव (ता. केज) येथील मांजरा प्रकल्प भरला आहे. त्यामुळे आज (दि. २८) सकाळी ९ वाजता धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात आणि मांजरा नदी पात्र व पाणलोट क्षेत्रात बुधवारी (दि. २७) रात्री ८ च्या सुमारास दमदार पाऊस पडला. त्यामुळे आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास धनेगावच्या मांजरा नदीवर असलेल्या मांजरा प्रकल्पाचे वक्र दरवाजे क्र १, २, ३, ४, ५ व ६ हे एकूण सहा दरवाजे हे ०.५० मीटरने उघडल्याची माहिती मांजरा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या सहा दरवाज्यातून मांजरा नदीपात्रात १०४८२.८४ क्युसेक (२९६.८८ क्युमेक्स) एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. पाण्याची आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासन आणि मांजरा प्रकल्प धनेगावचे अभियंता पाटील यांनी केले आहे.