

'Mandai-cha Raja' is being created along the lines of 'Lalbaugcha Raja'!
गोविंद खरटमोल
अंबाजोगाई : मुंबईच्या 'लालबागच्या राजा'च्या धर्तीवर अंबाजोगाईतील 'मंडईचा राजा' गणपतीची ओळख निर्माण होत आहे. शहरातील मंडई बाजार परिसरातील व्यंकटेश गणेश मंडळ ट्रस्टच्या वतीने गेल्या सुमारे 70 वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपली जात आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांमध्ये श्रद्धा असलेल्या 'मंडईच्या राजा'चे यंदाचे रूप विशेष आकर्षणाचे ठरले आहे. तब्बल 21 फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती सोन्या-चांदीच्या अलंकारांनी सजविण्यात आली असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे.
यंदा मंडळाने उभारलेल्या गणेशमूर्तीला सोन्याचा पाय आणि चांदीचा दात बसविण्यात आला आहे. गणपतीच्या सोंड, बाहू, कान आणि गळ्यातही सोन्याचे दागिने चढविण्यात आले आहेत. दररोज नवनवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केले जात असल्याने 'मंडईचा राजा'चे रूप दररोज वेगळे आणि आकर्षक दिसत आहे.
गणेशमूर्तीच्या एका पायासाठी सुमारे अर्धा किलो सोने वापरण्यात आले आहे. तसेच सौंड, बाहू, कान आणि गळ्यात सोन्याचे विविध अलंकार आहेत. मूर्तीवर एकूण सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने असल्याचे मंडळाकडून मंडळाकडून सांगण्यात आले. गणेशमूर्तीच्या एका दातासाठी 573 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. भव्य मूर्ती, सोन्या-चांदीचे अलंकार आणि आकर्षक सजावटीमुळे 'मंडईचा राजा' हा अंबाजोगाईतील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मंडळाच्या माहितीनुसार, मूर्तीची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे.
चोवीस तास पहारा
सोन्या-चांदीच्या अलंकारांनी सजविलेल्या या गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहर पोलिस विभागाकडून गृहरक्षक दलाचे दोन जवान पहारेकरी म्हणून तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्तेही गटागटाने 24 तास मूर्तीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत सुमारे 20 हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. देखावे आणि गणेशमूर्तीच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
विसर्जनावेळी दुग्धाभिषेकाची परंपरा
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मूर्तीला वाटेत दुग्धाभिषेक करण्याची आगळी परंपरा मंडळाने मागील वर्षापासून सुरू केली आहे. या उपक्रमाचेही भाविकांकडून कौतुक होत आहे. तसेच मुंबईच्या लालबागच्या राजाप्रमाणे अंबाजोगाईच्या 'मंडईचा राजा'ची ओळख निर्माण करण्यासाठी मंडळाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी नवीन उपक्रम आणि आकर्षक सजावटीच्या माध्यमातून हा गणपती अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असल्याचे व्यंकटेश गणेश मंडळ ट्रस्टचे विश्वस्त तथा नगर परिषद सदस्य अॅड. किरण भालेकर यांनी सांगितले.